'आम्ही वर गेल्यावर करणार का सुधारणा ?'

By admin | Published: June 7, 2016 07:35 AM2016-06-07T07:35:41+5:302016-06-07T07:35:41+5:30

मागील २० वर्षांपासून या परिसरात रस्ते, नाल्यांची कायम समस्या आहे.

'Why would we improve if we go up?' | 'आम्ही वर गेल्यावर करणार का सुधारणा ?'

'आम्ही वर गेल्यावर करणार का सुधारणा ?'

Next

२० वर्षांपासून समस्या कायम : दत्तकृपा, जयभोले, नेताजी, गाडगेबाबा कॉलनीतील नागरिकांचा सवाल
अमरावती : मागील २० वर्षांपासून या परिसरात रस्ते, नाल्यांची कायम समस्या आहे. महापालिका, नगरसेवक या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात तर फार बिकट स्थिती असते. या समस्या सोडविल्या जात नसल्याने ज्येष्ठ नागरिक फार संतापले आहेत. त्यामुळे आम्ही वर गेल्यावर सुधारणा करणार का, असा त्यांचा संतप्त सवाल आहे.
या परिसरात सुरुवातीच्या भागात नाल्या आहेत. नंतरच्या परिसरात नाल्यांचा अभाव असल्याने सांडपाण्याची मोठी डोकेदुखी आहे. ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली आहे. डासांचा उच्छाद आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. अंतर्गत रस्त्याची तर पुरती वाट लागली आहे. महापालिकेने नव्हे तर आमदार निधीतून रस्ते व बगिच्याला तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. दत्तकृपा कॉलनीतील एका रस्त्यावर सहा महिन्यांपासून मुरुम व गिट्टी टाकली आहे. परंतु अद्याप काम पुढे सरकलेच नाही. बगिच्यालगत एका प्राध्यापकाने घरचे सांडपाणी नालीत न सोडता बगिच्याजवळ खोल खड्डा करून त्यात सोडले आहे. तेथे लहान मुले खेळतात. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे.
या परिसरातील अनेक पथदिवे दिवसभर सुरू राहतात, बंद पडल्यास कित्येक दिवस सुरू होत नाही. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. वाहतुकीची मोठी समस्या या परिसरात आहे. तपोवन चौकापासून बराच लांब हा परिसर असल्याने व अंतर्गत रस्ते खराब असल्याने आॅटो या भागात येत नाहीत. कुणी आजारी पडल्यास उपचारार्थ दवाखान्यात नेण्यासाठी आॅटोदेखील मिळत नाही. त्यामुळे येथे आॅटो स्टँड असावा. शहर बससेवादेखील सुरू करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
अमरावती ते आर्वी हा राज्य महामार्ग या परिसरातून जातो. या मार्गावर नेहमी रेतीची जड वाहतूक केली जाते त्यामुळे रस्ते खराब होऊन अपघाताची शक्यता आहे, बगीच्याजवळ असणाऱ्या डीबीमधून वारंवार स्पार्कींग होते. या ठिकाणी मुले खेळतात हा प्रकारदेखील धोकादायक असल्याचे महिलांनी सांगितले.
महापालिकेद्वारा कचरा पेटी, घंटागाडी आदी कुठलीही सुविधा नाही. सफाई कामगार फिरकत नाही. लेआऊटमधील मोकळ्या जागेत बगीचा नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही सुविधा नाही. महिलांनी सामूहिकरीत्या कार्यक्रम करावा, यासाठी एखादा हॉल असावा, वाचनालय, रुग्णालय, शाळा, रुग्णवाहिका आदी कसल्याच सुविधा नाहीत. अलीकडेच चोऱ्यांचेदेखील प्रमाण या भागात वाढले आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी पदरचे पैसे खर्च करून मुरूम टाकला आहे. आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे. आधीच भरपूर समस्या असताना त्यात आणखी भर पडणार आहे. आम्ही महापालिकेचा टॅक्स भरत असताना आम्हाला इतर प्रभागाप्रमाणे सुविधा द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Why would we improve if we go up?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.