स्वत:ची किडणी देऊन तिने वाचवले पतीचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 07:40 PM2019-04-10T19:40:15+5:302019-04-10T20:19:44+5:30
पत्नीने पतीला किडणी दान करून अर्धांगिनीचा अर्थ समाजाला सांगितला.
अमरावती - पत्नीने पतीला किडणी दान करून अर्धांगिनीचा अर्थ समाजाला सांगितला. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी ही सातवी किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
अमरावती शहरातील संजय रामराव लोनसने (५४) दोन वर्षांपासून किडणीच्या आजाराने त्रस्त होते. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात किडणी प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक व विशेष कार्य अधिकारी टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात रुग्ण व नातेवाइकांना समुपदेशन करण्यात आले. यावेळी संजय लोनसने यांची पत्नी माधवी यांनी किडणी दान करण्यास होकार दिला. डॉक्टरांच्या चमूने विविध चाचण्या केल्यानंतर माधवी यांची किडणी जुळल्याचा अहवाल दिला. मंगळवारी किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून माधवी यांनी पती संजयला जीवनदान दिले.
नागपूर येथील तज्ज्ञांकडून शस्त्रक्रिया
नागपूर येथील किडणी प्रत्यारोपण तज्ज्ञ तथा युरोलॉजिस्ट संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. निशांत बावनकुळे यांची शस्त्रक्रियेसाठी विशेष उपस्थिती होती. याशिवाय सुपर स्पेशालिटीतील युरोसर्जन राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी, सौरभ लांडे, बधिरीकरण तज्ज्ञ रामप्रसाद चव्हाण व प्रणित घोनमोडे यांनी काम पाहिले.
यांनी सांभाळली कायदेशीर प्रक्रिया
किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याकरिता किडणी ट्रान्सप्लान्ट को-आॅडिनेटर मोनाली चौधरी व समाजसेवी अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अधिसेविका माला सुरपाम, ओटी स्टाफ प्रतिभा अंबाडकर, नीता श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडिले, ज्योती काळे, रीतू बैस, आयसीयू स्टाफमधील आशा गडवार, अलका मोहोड, भारती घुसे, जमुना मावस्कर, शुभांगी टिंगणे, नम्रता दामले, कविता बेरड यांनी कामकाज पाहिले.
यांचे लाभले सहकार्य
यवतमाळ येथील राज्य प्राधिकार समितीचे अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार, समिती अध्यक्षा स्नेहल कुळकर्णी, अकोला येथील आरोग्य उपसंचालक आर.एस. फारुकी, यवतमाळचे जिल्हा शल्यचिकित्सक टी.सी. राठोड व दिनकर पाटील या समिती सदस्यांनी शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेला मान्यता दिली. यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील डॉ. मीनल चव्हाण, प्रकाश येणकर यांचे सहकार्य लाभले. ट्रान्सप्लॉन्ट यशस्वीतेसाठी अशोक किनवटकर, अमोल वाडेकर, विनोद पाटील, प्रफुल्ल निमकर, कुंदन मातकर तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, तांत्रिक कर्मचारी व कार्यालयीन व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे मोलाचे सहकार्य लाभले.