पतीने गळफास घेतल्याचे कळताच पत्नीने घेतले विष; अमरावती जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:22 AM2019-08-17T11:22:13+5:302019-08-17T11:30:51+5:30
पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगडे (२५) व पूनम मयूर मरगडे (२२, दोन्ही रा. शिवणी रसुलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवणी रसुलापूर येथील रहिवासी मयूर मरगडेचे येणस गावातील पूनमशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. दोघेही शिवणीत राहत होते. बुधवारी मरगडे दाम्पत्य रक्षाबंधन कार्यक्रमासाठी येणस गावी गेले होते. गुरुवारी मयूर शिवणी रसूलापूर गावी निघून गेला, तर पूनम ही माहेरीच थांबली. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मयूरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या माहितीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी मयूरचा मृतदेह नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला.
दरम्यान, मयूरने आत्महत्या केल्याची माहिती पूनमला फोनवरून कळविण्यात आली. पतीच्या निधनाची वार्ता कळताच पूनमला धक्का बसला. तिनेही दुपारी २.३० च्या सुमारास विष प्राशन केले. यादरम्यान शेतात असलेले पूनमचे वडील रामराव उंबलकार यांना जावयाच्या आत्महत्येबद्दल माहिती प्राप्त झाली. त्यांनी शिवणीला जाण्यासाठी घर गाठले असता, पूनमने विष प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी पूनमला मृत घोषित केले. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीतील अनेकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. यामुळे मोठी गर्दी झाली होती.
मयूरला दारूचे व्यसन
मयूर शेतमजुरी करून कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. त्याला मद्याचे व्यसन व जुगार खेळण्याचा नाद होता. त्यामुळे अनेकदा सासरे रामराव उंबलकार समजावून सांगायचे. जुगारात पैसे हरल्याच्या मानसिक तणावातून शुक्रवारी त्याने मद्याच्या अंमलातच आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू होती.
पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर पत्नीनेही विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविले. या घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
- नरेश पारवे, पोलीस निरीक्षक, नांदगाव खंडेश्वर