वन्यप्राण्यांचा हल्ला; अर्थसहाय्यात वाढ
By admin | Published: November 14, 2016 12:11 AM2016-11-14T00:11:34+5:302016-11-14T00:11:34+5:30
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन, मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम कमी ..
शासन निर्णय निर्गमित : ४८ तासांच्या आत घटनास्थळाचा पंचनामा अनिवार्य
अमरावती : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन, मृत, अपंग किंवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्त व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे वन्य पशुंच्या हल्ल्यातील जखमी, मृत व्यक्तिंना दिलासा मिळणारा आहे. याबाबतचा निर्णय महसूल व वनविभागाने ११ नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.
वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुकर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे गाय, बैल, म्हैस, मेंढी, शेळी किंवा इतर पशुधन मृत, अपंग तसेच जखमी झाल्यास २ जुलै २०१० शासन निर्णयाद्वारे नुकसान भरपाईची रक्कम संबंधिताना प्रदान करण्यात येते. परंतु अर्थसहाय्याची रक्कम कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्याची बाब शासन विचाराधीन होती. त्याअनुषंगाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के किंवा २५ हजार यापैकी कमी असणारी रक्कम नव्या अर्थसहाय्यात दिली जाणार आहे. मेंढी, बकरी आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किंमतीच्या ७५ टक्के रक्कम किंवा ६ हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम दिली जाईल. गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा ७ हजार ५०० रुपये यापैकी कमी असणारी रक्कम अर्थसहाय्य म्हणून देय करण्यात येणार आहे.
गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करण्यात येणार आहे. देय मर्यादा रक्कम बाजारभावाच्या २५ टक्के किंवा दोन हजार ५०० रुपये प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम तसेच सदर अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे नवीन शासन निणर्यात नमूद आहे. जनावर मालकाने पशू मेल्यावर किंवा घटना घडल्यावर ४८ तासाच्या आत नजिकच्या वनाधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना कळविणे गरजेचे आहे. वन्य पशुंच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित वनपालाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन ताडडीने पंचनामा करणे अनिवार्य आहे. संबंधित अर्थसहाय्यतेची रक्कम पशुधन मालकाच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच हल्ल्यात मृत व्यक्तिच्या कुंटुंबियांना ८ लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वन्यपशुंमुळे शेतीपिकाचे होणारे नुकसान भरपाईसाठी अर्थसहाय्य रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतीकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
महसूल व वने मंत्रालयाकडून निर्गमित झालेल्या शासन आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत जनावरांचा घटनास्थळी पंचनामा करुन मालकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
- हेमंत मीना
उपवनसंरक्षक, अमरावती.