अमरावतीत अवकाळी पावसामुळे वन्यप्राण्यांना दिलासा, जंगलातील वणव्यांना ‘ब्रेक’

By गणेश वासनिक | Published: May 4, 2023 05:01 PM2023-05-04T17:01:10+5:302023-05-04T17:02:00+5:30

फेब्रुवारी महिन्यातच वणव्यांच्या हंगामास तीव्र सुरुवात झाल्याने वन विभागाची चिंता वाढली होती.

Wild animals get relief due to unseasonal rains in Amravati, 'break' to forest fires | अमरावतीत अवकाळी पावसामुळे वन्यप्राण्यांना दिलासा, जंगलातील वणव्यांना ‘ब्रेक’

अमरावतीत अवकाळी पावसामुळे वन्यप्राण्यांना दिलासा, जंगलातील वणव्यांना ‘ब्रेक’

googlenewsNext

अमरावती : यंदा फेब्रुवारीपासूनच वनांतील वणव्यांच्या घटनांत वाढ होत असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वन्यप्राण्यांना दिलासा आणि जंगलातील वणव्यांना ‘ब्रेक’ लागल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात भारतीय वन सर्वेक्षण संस्थेनेसुद्धा अहवाल प्रसिद्ध केला असून, गत काही दिवसांत राज्यात वणव्याची एकही घटना न घडल्याचे स्पष्ट केले आहे.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच वणव्यांच्या हंगामास तीव्र सुरुवात झाल्याने वन विभागाची चिंता वाढली होती. यामुळे वन विभागाला वन वणव्यांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे लागले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातसुद्धा वणव्याच्या घटना वाढत होत्या. मात्र, असे असताना अचानक आलेल्या पावसामुळे जंगल आणि जंगलातील आग विझविण्यासाठी काम करणाऱ्या वन विभागालासुद्धा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी सॅटेलाईटच्या माध्यमातून फाॅरेस्ट अलर्ट प्राप्त होत असतात. साधारणतः जंगलाचा फायर सीझन हा डिसेंबरमध्ये सुरू होतो आणि तो जूनपर्यंत चालतो. भारतीय वन सर्वेक्षण संस्था (एफएसआय) उपग्रहावरून डेटा घेते आणि सर्व राज्यांना याबाबत अलर्ट म्हणून माहिती देते.

सामायिक केलेल्या जीपीएस स्थानाच्या आधारे प्रत्यक्ष क्षेत्रात कर्मचारी तपासणी करतात. त्या अनुषंगाने बऱ्याच बाबतीत लोक जंगलाच्या परिघावर किंवा सीमेवर वास्तव्याला आहेत. कर्नाटक राज्याच्या रेकॉर्डनुसार सन २०२० मध्ये त्यांना डिसेंबर २०२० पर्यंत चार हजारपेक्षा जास्त अलर्ट आले होते. यापैकी ७० ते ७५ टक्के जंगलाबाहेर आहेत. महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव या व्याघ्र प्रकल्पात तर टिपेश्वर, पैनगंगा, उमरेडसारख्या अभयारण्यात आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्व वणवे मानवनिर्मित आहेत. तथापि, यंदा एप्रिलमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि ती आजतागायत अधूनमधून कायम आहे. त्यामुळे काही जंगलातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे पाण्याने तुडुंब भरले आहेत. तृष्णा भागविण्यासाठीची वन्यप्राण्यांची धावपळ थांबली असून, वणव्याच्या घटनांना ‘ब्रेक’ लागला आहे.

वन वणव्यामुळे वाघ ते वाळवी, अशी संपूर्ण अन्नसाखळी धोक्यात येते. यात केवळ वन्यप्राणी व पक्षी यांनाच जीव गमवावा लागत नाही तर साप, पाली, सरडे, मुंग्या या प्रकारच्या जीवांचे मृत्यूचे प्रमाण मोजता येत आहे. वन वणवा हा एक वनांना मोठा धोका आहे. गवत जळल्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची उपासमार होते. वाघांचे खाद्य धोक्यात येते. यासंदर्भात स्थानिक समुदायांमध्ये जागृती करण्याबरोबरच कायद्याचीसुद्धा कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक, अमरावती

Web Title: Wild animals get relief due to unseasonal rains in Amravati, 'break' to forest fires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.