जंगलातील पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान
By admin | Published: April 25, 2017 12:08 AM2017-04-25T00:08:01+5:302017-04-25T00:08:01+5:30
वडाळी व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्यामुळे हे पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान ठरले आहे.
रेलचेल वाढली : वन्यप्राणी गणनेसाठी वन्यप्रेंमीत उत्सुकता
वैभव बाबरेकर अमरावती
वडाळी व चांदूररेल्वे वन परिक्षेत्रातील पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्यामुळे हे पाणवठे वन्यप्राण्यांच्या तृष्णेसाठी वरदान ठरले आहे. शहरालगतच्या जंगलात यंदा प्रथमच वन्यप्राणी गणना होत असल्यामुळे पानवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेण्यासाठी वन्यप्रेंमीमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांना काही नैसर्गिक, तर कृत्रिम पाणवठ्यांवर अवलंबून राहावे लागते. पाणीस्त्रोत कमी झाल्याने पाणवठेच वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यंदा पोहरा-चिरोडी वनपरिक्षेत्रात तब्बल १५ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाणवठ्याजवळ मचाण बांधून ही होणार आहे. प्रत्येक वन्यप्राण्याला २४ तासांतून एकदा पाणी प्यावेच लागते, त्यासाठी प्राणी हे पाणवठ्यावर जातात. प्राणी गणना करताना त्यांना त्रास न होता नोंदी घेणे अपेक्षित असते. या नोंदीवरून प्राणी प्रजातींच्या संख्येचा अंदाज येतो. यंदा मार्च महिन्याच्या अखेरच तापमान ४५ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे उन्हाच्या झळांनी मनुष्यासह वन्यप्राणीसुध्दा होरपळून निघालेत. जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांनी पाणवठ्यांचा आधार घेतला आहे. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दररोज पानवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू असल्याची छायाचित्रे सीसीटीव्हीत कैद होत आहेत. कातलबोडीतील वाघ पोहरा-चिरोडी जंगलात वास्तव्यास असल्यामुळे ट्रॅप कॅमेऱ्यांवर दररोज मॉनिटरींग सुरू आहे. पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची रेलचेल सुरू झाली आहे.
मचाणीवर रोमांचक अनुभव येणार
पोहरा-चिरोडी जगंलात प्रथमच मचाण बांधून वन्यप्राण्यांची गणना होणार असून यादरम्यान वन्यप्रेंमीना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. २४ तास मचाणवर बसून वन्यप्राण्यांची गणना करताना कोणकोणते वन्यप्राणी पानवठ्यावर येतात, यांच्या नोंदी वन्यप्रेंमी घेणार असून यादरम्यान त्यांना विविध अनुभव येणार आहे.
पोहरा-चिरोडी जंगलात १५ मचाणी बांधण्याचे काम सुरू आहे. १० मे रोजी पाणवठ्यावर वन्यप्राणी गणना केली जाणार आहे. पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांची रेलचेल वाढली आहे.
- हेमंतकुमार मीणा,
उपवनसरंक्षक, अमरावती वनविभाग
पाणीस्त्रोत आटल्यामुळे वन्यप्राण्यांना कृत्रिम पाणवठ्यावर अवलंबून राहावे लागते. सद्यस्थितीत पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची मोठी रेलचेल सुरू झाली असून वन्यप्राणी गणनेत वन्यप्रेंमींना रोमांचक अनुभव घेता येणार आहे.
- स्वप्निल सोनोने,
वन्यजीव अभ्यासक