वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 06:21 PM2019-06-15T18:21:41+5:302019-06-15T18:22:45+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत.
- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वन्यजीव विभागाने दीड कोटींहून अधिक लाडू जंगलात सोडले आहेत. जंगलात सोडलेले लाडू काळ्या मातीचे असून, त्यात बांबू बी टाकले आहे. मनुष्यबळाचा वापर करून हे खास ‘सीड बॉल’ वन्यजीव विभागाने बांधून घेतले. या मातीच्या लाडवातून बांबूचे बी वनक्षेत्रात रुजविण्याचा मेळघाटच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. या मातीच्या लाडवाच्या माध्यमातून जंगलात बांबूची लागवड करण्याचा, जंगलाची घनता वाढविण्याचा, जंगलातील अवघड ठिकाणांसह जंगलात जिथे बांबू नाही, त्या ठिकाणी ते रुजविण्याचा प्रयत्न झाला आहे.
आकोट वन्यजीव विभागात सर्वत्र, गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल, तारूबांदा, वैराट तसेच सिपना वन्यजीव विभागात सेमाडोह पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात हे लाडू मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहेत. यात वन्यजीव क्षेत्रातील मानवी वापर कमी करीत कुठलेही खड्डे किंवा खोदकाम न करता बांबू रोपांची लागवड झाली आहे. नर्सरीत बांबू रोप तयार करून त्या पॉलीथीन बॅगमधील बांबू रोपांची जंगल क्षेत्रात नेण्यापर्यंतचा होणारा खर्च टाळण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे.
चिकण मातीचे लाडू बांधण्यात चिखलदरा फॉरेस्ट ट्रेनिंग स्कुलच्या प्रशिक्षणार्थींसह गावपातळीवरील वनसमितीचाही सहभाग उल्लेखनीय राहिला. पहिल्या पावसातच हे लाडू फुटलेत अन् जागीच पसरलेत. या पसरलेल्या मातीत त्या बांबू बिया जागेवरच नैसर्गिक वातावरणात उगवल्यात. यातून बांबूची रोपं जंगलात वाढीस लागली. यात बांबू बियांची उगवण क्षमता अधिक राहली असून जवळपास ९० ते ९५ टक्के लाडवातून बांबूच्या रोपट्यांनी जंगलात पाय रोवले आहेत. जंगलातील गवतासोबतच त्यांनीही जागा मिळवली आहे.
बांबू बियांनी लक्षावधी दिले कमवून
मेळघाटातील घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत भवई-भुलोरी जंगल परिसरात ४०४ हेक्टर क्षेत्रातील बांबू १५ ते २० वर्षांत पहिल्यांदाच फुलावर आले. बांबूचे बी ग्रामस्थांनी गोळा केले. २०० रुपये किलो दराने ते भुलोरी ग्रामपंचायतने विकत घेतले. ग्रामपंचायतने हे बी ३०० रुपये किलोने विकले. राज्यातच नव्हे, तर मध्य प्रदेश वनविभागानेही हे बी विकत नेले. यात ग्रामपंचायतीला २३ लाख मिळालेत. मेळघाट वनक्षेत्रातही या बांबू बियांचा वापर केला गेला आहे.