वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वन्यप्राण्यांच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:35+5:302021-05-25T04:14:35+5:30
पोहरा : वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या हौसेखातर चिरोडी तलावावर अमरावती शहरातील युवकांचे जत्थे येत आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांच्या वर्दळीने ...
पोहरा : वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या हौसेखातर चिरोडी तलावावर अमरावती शहरातील युवकांचे जत्थे येत आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांच्या वर्दळीने प्रदूषणात भर घालण्यासोबतच तलावावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी पळून जातात. तलावाच्या परिसरात ऐन जनावरांच्या पाणी पिण्याच्या वेळेला गर्दी राहते. प्रतिबंधित क्षेत्रात होणारी ही गर्दी हटविण्यासाठी कुठलीही उपाययोजना अद्याप वनविभागाने केलेली नाही.
चिरोडी वर्तुळातील पश्चिम चिरोडी बीटमधील तलाव परिसरात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर आता सर्वांनाच ठाऊक आहे. तलाव परिसरात बिबट्यासह अन्य वन्यप्राणी आढळून येत असल्याने शहरातील तरुणांमध्ये या परिसराचे आकर्षण आहे. अमरावती शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तलाव परिसरात अप्रतिम निसर्गसौंदर्य असल्याने दिवसेंदिवस युवकांची पावले त्याकडे वळली आहेत. त्यामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा हौस असणाऱ्या नवख्या, श्रीमंत तरुणांचा भरणा आहे. या ठिकाणाला भेट देऊन एकदा तरी बिबट्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. एवढेच नव्हे तर सोबतीला मित्र आणि खाण्याचे पदार्थ घेऊन पिकनिकला जाण्याच्या अविर्भावात हे कथित वन्यप्रेमी येथे दाखल होतात. या तलाव परिसराच्या कडेला बसून भोजनाचासुद्धा आस्वाद घेतात. त्यांच्या वारंवार दाखल होण्यामुळे वन्यजिवांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे.
चर खोदला, त्यानंतर स्वस्थता
मुळात वन्यपरिसर हा माणसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे वाहने रोखण्याकरिता तलावाकडे नेणाऱ्या पाऊलवाटेवर वनविभागाने चर खोदले. तेथपर्यंत वाहन नेऊन त्यापुढे पायी तलावाकडे जाऊन बिबट व आदी वन्य प्राण्यांचे फोटोसेशन करण्यासाठी भल्या पहाटे व रात्री अंधार पडल्यानंतर युवक आढळून येतात. चर खोदल्यानंतर मात्र वनविभागाने काहीही केलेले नाही.
-------------
मानव-वन्यप्राणी संघर्षाची भीती
जंगलातील एकमेव तलावावर शहरवासीयांनी ताबा केल्याने वन्यप्राणी पाण्याशिवाय परततात. अशा प्रसंगात एखादेवेळी बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ल्याची व त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.
आळा बसेल तरी केव्हा?
वनक्षेत्रात मनुष्याने प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध वन अधिनियमांनुसार गंभीर स्वरूपाचे वनगुन्हे दाखल करण्याबाबतचे फर्मान असून, या संरक्षित तलाव परिसराच्या वनक्षेत्रात प्रवेश करणे निषिद्ध आहे. ही नियमावली असूनही युवकांचा सततचा वावर ही बाब वन्यपशू, वन्यजिवांसाठी धोकादायक ठरणारी आहे. या नियमबाह्य प्रकाराला केव्हा आळा बसेल, याची प्रतीक्षा वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.