अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर ‘बोमा’ पद्धतीने वन्यप्राण्यांचे ‘ट्रॅप’; राज्यात पहिलाच प्रयोग
By गणेश वासनिक | Published: August 18, 2024 08:48 PM2024-08-18T20:48:16+5:302024-08-18T20:49:23+5:30
विधानसभा आचारसंहितेपूर्वीच विमानांचे ‘टेक ऑफ, लँडिंग’ ची चिन्हे
अमरावती : अमरावती विभागासाठी मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाची विकासकामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र, येत्या काळात विमानांचे ‘टेक ऑफ, लँडिंग’साठी अडसर ठरणाऱ्या वन्यप्राण्यांना विमानतळ परिसरातून बाहेर काढण्यासाठी ‘बोमा’ पद्धतीचा वापर केला जात आहे. त्याकरिता वन विभागाने विमानतळाच्या परिसरात कार्यवाही सुरू केली असून, लवकरच वन्यप्राण्यांचे ‘ट्रॅप’ करून त्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षितपणे पाठविले जाणार आहे. वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी ‘बोमा’ पद्धत ही राज्यात पहिल्यांदाच अमरावतीत वापरली जात आहे.
बहुप्रतीक्षित बेलाेरा विमानतळाची विविध विकासकामे वेगाने सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच बेलोरा विमानतळाचे लोकार्पण करण्याची राज्य सरकारने तयारी चालविली आहे. एटीआर-७२ आसनी विमान सेवा पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. अमरावती ते मुंबई, अमरावती ते पुणे या विमानसेवेसाठी राज्य शासनाने एका खासगी कंपनीसाेबत करारदेखील केला आहे. मात्र, बेलाेरा विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असल्याने ते भविष्यात विमानसेवेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या निर्देशानुसार बेलाेरा विमानतळ परिसरातून वन्यप्राणी पकडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत वापरल्या जाणारी ‘बोमा’ पद्धत अवलंबवली जात आहे.
काय आहे ‘बोमा’ पद्धत
वन्यप्राणी जेरबंद करण्यासाठी ‘बोमा’ ही पद्धत वापरली जाते. यात वाय आकाराचे कुंपण तयार केले जाते. या भागाला पूर्णत: नैसर्गिक लूक असतो. वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू होण्यासाठी एक मोठा रॅम्प तयार केला जातो. तीनही बाजूंनी कप्पे तयार करून एका बाजूचा निमुळता आकार राहत असून, त्याच भागात वाहन उभे केले जाते. वाय प्रकारचा आकार तीनही बाजूंनी हिरव्या नेटद्वारे वेढला जातो. जंगलाच्या बाजूने वन्यप्राणी हाकलत आणून रॅम्पच्या निमुळत्या भागात लावण्यात आलेल्या अद्ययावत वाहनात हे वन्यप्राणी सुरक्षितपणे रेस्क्यू केले जातात. यापूर्वी मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यात ही पद्धत वापरली गेली आहे.
वन विभागाकडून वन्यप्राणी पकडण्यासाठी बेलाेरा विमानतळ परिसरात पहिल्यांदाच ‘बोमा’ पद्धत अवलंबविली जात आहे. तयारी जाेरात सुरू असून, मध्य प्रदेशातून वाहन आणले जाणार आहे. या पद्धतीमुळे लवकरच विमानतळ परिसर वन्यप्राणीमुक्त होणार आहे.
-ज्योती पवार, सहायक वनसंरक्षक, अमरावती