बंद पडणाऱ्या दूध योजना पीपीपी तत्त्वावर पुनर्जीवित होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:45 PM2018-05-06T22:45:30+5:302018-05-06T22:45:50+5:30
दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-निविदा प्रक्रियाद्वारा नियुक्ती करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली.
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनर्जिवित करण्यास व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अहवाल सादर करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची ई-निविदा प्रक्रियाद्वारा नियुक्ती करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, परतवाडा व सेमाडोह (ता. चिखलदरा) ही तीन शीतकरण केंद्रे दूध मिळत नसल्याने बंद पडली आहेत.
पीपीपी तत्त्वावर बंद पडलेल्या किंवा पडणाºया संस्था पुनर्जिवित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या १७ एप्रिल २०१४ च्या शासननिर्णयानुसार विहित प्रक्रियाद्वारा तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात दिली होती. २०१४ च्या शासन निर्णयाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पीपीपी प्रक्रियाद्वारा तांत्रिक सल्लागारांच्या नियुक्तीस पुढीत मुदतवाढ दिल्याचे आढळले नव्हते. त्यामुळे तांत्रिक सल्लागाराऐवजी ई-निविदा प्रक्रियाद्वारा तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती करण्याचे शासनाने ठरविले होते. अमरावती विभागातही अनेक शीतकरण केंद्रे बंद होण्याच्या स्थितीत आहेत.
दुधाला भाव नाही
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धविकास व्यवसायाला चालना मिळण्यासाठी शासनाने जिल्ह्यात तीन शीतकरण केंद्र स्थापन केले. पण, ग्रामीण भागात शासकीय दुधाला चांगला भाव मिळत नसल्याने मोर्शी चार हजार लिटर क्षमतेचे दूध शीतकरण केंद्र बंद पडले आहे, परतवाडा चार हजार लिटर क्षमता व सेमाडोह पाच हजार लिटर क्षमतेची शीतकरण केंद्र बंद पडली आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार या केंद्राचे पुनर्जीवित करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेली तीन शीतकरण केंद्रे बंद आहेत. दुधाच्या साठवण क्षमतेनुसार दूध मिळत नसल्याचे मुख्य कारण आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संपत जांभुळे,
जिल्हा दुग्धव्यवसाय
विकास अधिकारी, अमरावती