जिल्हा सामान्य रुग्णालय कधी होणार अद्ययावत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:33 PM2019-06-10T22:33:06+5:302019-06-10T22:33:25+5:30
सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीत असताना इंग्रज सरकारने सामान्य नागरिकांना आरोग्यच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता सन १९२८ मध्ये इर्विन चौक स्थित जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यावेळची लोकसंख्या कमी असताना रुग्णालयाची इमारत त्यात १६ वार्ड, अतिदक्षता विभाग, पेर्इंग वार्ड, अपघात कक्ष होते. ही स्थिती लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आजघडीला विविध आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता यात काहीच बदल करण्यात आलेले नाही. खाटांची संख्या तेवढीच आहे. तेथे नर्सचा स्टाफ तेवढा आहे. प्रत्येक वार्डात ५ नर्सेस व वार्ड बॉयची व्यवस्था केलेली आहे. मात्र वार्ड बॉय निमित कर्तव्यावर राहत नसल्याने आर्थोपेडिक कक्षातील रुग्णांना औषधोपचार करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रपाळीत दोन नर्स राहत असताना वार्ड बॉय अनुपस्थित असतो. त्यामुळे ड्रेसिंगपासून विविध कामे कार्य नर्सेसनाच पार पाडावी लागतात. निधारित पदेदेखील पूर्णत: भरण्यात आली नसल्याने मनुष्यबळाअभावी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. परिणामी रुग्णांना सुरळीत सेवा मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक वार्डात ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रुग्णांची संख्या प्रत्येक वार्डात ६० च्या वर राहत असल्याचा आजतागायतचा अनुभव तेथील अधिसेविका मंदा गाढवे यांनी व्यक्त केला. १९२८ पासून आजपर्यंत १९१ वर्षांनंतरही आहे त्याच व्यवस्थेत रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्यामुळे एकाच खाटावर दोन तर कधी खालीसुद्धा रुग्णांवर औषधोपचार करावा लागत आहे. या समस्येकडे आरोग्य प्रशासनाचे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात सीएस आणि आरएमओंशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
आर्थोपेडिकमध्ये ३० खाटा, ४३ रुग्ण
इर्विन रुग्णालयातील आर्थोपेडिक कक्षा ३० खाटा असताना ४३ रुग्ण सोमवारी उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे सर्वच वार्डांत खाटांच्या संख्येपेक्षा रुग्णसंख्या दुप्पटच राहत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. ब्रिटिश काळात निर्माण झालेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटांची व्यवस्था स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली असताना व वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटांची ही संख्या तोकडी पडत आहे.