ईसीएचएसच्या इमारतीसाठी निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:46 AM2019-08-18T01:46:32+5:302019-08-18T01:47:22+5:30
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे. तेथे तीन मजली सुसज्य अशा नवीन इमारतीच्या बांधकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता आमचे प्रयत्न सुरू असल्याचे महाराष्ट्र व गोवा सब एरियाचे जनरल कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल राजेश कुंद्रा (सेना मेडल) यांनी सांगितले.
शुक्रवारी मेजर जनरल राजेश कुंद्रा यांनी शिवाजीनगर स्थित अमरावती इसीएचएस पॉली क्लिनिकला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अमरावती इसीएचएस पॉली क्लिनिक माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असल्याने तसेच देशातील ४२६ पॉली क्लिनिकमध्ये सात राज्यांमधून अमरावतीचेसुद्धा उत्कृष्ट कार्य असल्याने त्यांना या कामगिरीबद्दल वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झालेल्या निधीचा एक धनादेश पाली क्लिनिकचे आॅफिसर इन्चार्ज कॅप्टन अरविंद चांडक व त्यांचे सहकारी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा यथोचित गौरवदेखील करण्यात आला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच ज्या ठिकाणी इसीएचएस पॉली क्लिनिकची नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणीसुद्धा त्यांनी केली.
यावेळी सीएडी पुलगाव स्टेशन कमांडर ब्रिगेडीयर गोलडस्मित, अॅडम कमांडर लेफ्टनंट कर्नल संजीवकुमार उपस्थित होते. यावेळी प्रेझेंटेशनव्दारे पॉली क्लिनिकचे आॅफिसर इर्न्चाज कॅप्टन अरविंद चांडक यांनी पॉली क्लिनिकच्या प्रगती अहवालाची माहिती सादर केली.
माजी सैनिकांना आरोग्य सेवा
अमरावती येथील ईसीएचएस पॉली क्लिनिकमध्ये माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना चांगली आरोग्यसेवा देण्याचा मानस असल्याचे ईसीएचएसचे आॅफिसर इन्चार्ज कॅप्टन अरविंद चांडक यांनी सांगितले. पॉली क्लिनिकमध्ये पॅथॉलॉजी लॅब, दंत चिकित्सक सेवा इतर आरोग्य सेवा दिली जाते. शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे पाठविले जाते.