आव्हान स्वीकारले, काश्मीरमध्ये जाऊन करणार हनुमान चालीसा पठण, पण.. नवनीत राणांचे मुख्यमत्र्यांना प्रतिआव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 03:36 PM2022-06-09T15:36:40+5:302022-06-09T16:10:37+5:30
काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
अमरावती : हनुमान चालीसावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. काल औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. तसेच हनुमान चालीसा प्रकरणांवर बोलताना त्यांनी, हिंमत असेल तर काश्मीरात जाऊन हनुमान चालीसा म्हणा, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्त्व्यावर खासदार नवनीत राणांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.
नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं आहे. काश्मीर भारताचा भाग आहे आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणे कठीण आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर मी तिथे जाऊन हनुमान चालीसा पाठ करेन, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करतील त्या दिवशी मी काश्मीरमध्ये कधी आणि केव्हा हनुमान चालीसा वाचणार याची तारीख व वेळ जाहीर करेल, असे त्या म्हणाल्या. मंदिर, हनुमान चालीसा पठण आपल्याला महत्वाचे वाटत नसेल, तर तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणून कसं काय रिप्रेझेंट करू शकता, असे म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, काल त्यांनी औरंगाबादच्या जनतेच्या समस्यांवर मुख्यमंत्री म्हणून बोलायला हवे होते, पण त्यांनी मला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा, असे आव्हान दिले. त्यांनी तेथील जनतेच्या समस्यांवर, पाणी प्रश्नावर का नाही चर्चा केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासह, काश्मीरमधील टार्गेट किलिंग आणि काश्मिरी पंडितप्रकरणावर बोलताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशवासीयांसोबत आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पाऊल हे सरकार उचलत आहेत. जनतेला त्यांच्यावर विश्वास असून देशभरातील नागरिक त्यांच्यासोबत आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या.