पालकमंत्री देणार का सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे आदेश?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:27 PM2018-09-25T22:27:18+5:302018-09-25T22:29:15+5:30

रविवारी एका दिवसात डेंग्यूने दोन रुग्ण दगावले. त्यामुळे महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध पालकमंत्री स्वत: केव्हा गुन्हा दाखल करणार, असा सवाल मृतांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. बडनेरा येथिल फारुख शेख व राजापेठ येथिल मेघा वानखडे अशी मृतांची नावे असून त्यांचा रविवारी रात्री दोन वेगवेगळ्या रुग्णालयात डेंग्यूमुळे मृत्यू झाला.

Will the Guardian Minister give the order for the crime of human rights? | पालकमंत्री देणार का सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे आदेश?

पालकमंत्री देणार का सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे आदेश?

Next
ठळक मुद्देडेंग्यूचे दोन बळी : डॉक्टरांवर महापालिकेची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रविवारी एका दिवसात डेंग्यूने दोन रुग्ण दगावले. त्यामुळे महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध पालकमंत्री स्वत: केव्हा गुन्हा दाखल करणार, असा सवाल मृतांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. बडनेरा येथिल फारुख शेख व राजापेठ येथिल मेघा वानखडे अशी मृतांची नावे असून त्यांचा रविवारी रात्री दोन वेगवेगळ्या रुग्णालयात डेंग्यूमुळे मृत्यू झाला.
अख्खे शहर डेंग्यूने कह्यात घेतल्याच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यात महापालिका आयुक्त संजय निपाणे व आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांची कानउघाडणी केली. नैताम यांना चांगलेच फैलावर घेतले. दुसऱ्या दिवशी ते भल्या पहाटे बाहेर पडले. शहरातील कानाकोपरा धुंडाळत त्यांनी महापालिका प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली. त्याही दिवशी ते आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांवर भडकले.
कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
कंटेनरलगतची अस्वच्छता व ठिकठिकाणी साचलेली घाण पाहून येथे जनावरे नाहीत, तर माणसे राहतात, याची जाणीव महापालिका प्रशासनास करून दिली. पाहणी दौºयात जेथे अनियमितता आढळून आली, तेथील संबंधितांचे निलंबनाचे आदेश त्यांनी दिलेत. त्याचवेळी डेंग्यू व साथरोगामुळे बळी गेल्यास जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा मी स्वत: दाखल करेन, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्या इशाराने खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शनिवारी पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
मात्र, आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. अशातच रविवारी २३ सप्टेंबर रोजी डेंग्यूने दोन बळी घेतले. परिणामी नवीवस्ती बडनेरा येथील शेख फारुख शेख छोटू या तरुणाचा पीडीएमसीत रविवारी मृत्यू झाला. डेंग्यू तापाने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान पीडीएमसी प्रशासनाने केले आहे. रविवारी रात्री १०.५० च्या सुमारास मेघा वानखडे यांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यांची एनएस वन ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती बोंडे हॉस्पिटलमधील डॉ. स्वप्निल शिरभाते यांनी दिली.
खासगी डॉक्टरांवर महापालिकेची दहशत
हायटेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (बोंडे हॉस्पिटल) उपचारादरम्यान दगावलेल्या महिलेला सिकलसेल झाल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले. मात्र, त्या रुग्ण महिलेची एनएस-वन चाचणी पॉझिटिव्ह असल्याचेही डॉ. शिरभाते यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात त्या महिलेचा मृत्यू डेंग्यूने झाला असला तरी महापालिकेची ब्याद किंवा कारवाईची कटकट आपल्यामागे नको, या विचारातून त्या महिलेच्या रिपोर्ट कार्डमध्ये सिकलसेलचा अंतर्भाव करण्यात आल्याचा सूर अन्य तज्ज्ञ डॉक्टरांमधून उमटला आहे.
बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
बडनेरा : नवीवस्तीच्या गवळीपुरा येथील शेख फारुख शेख छोटू (३३) या तरूणाचा डेंग्यूने बळी घेतला. डेंग्यूचा प्रकोप वाढीस महापालिका कारणीभूत धरून अधिकाऱ्यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी बडनेरा पोलिसांत मंगळवारी तक्रार दिली. आठ दिवसांत गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवा स्वाभिमानचे सिद्धार्थ बनसोड यांनी दिला. शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लूचे रूग्ण वाढू लागले असून, आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात उपापयोजना केल्या नाहीत. त्यामुळे शेख फारुख याला जीव गमवावा लागला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर आदींनी केली आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा?
राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील व पालक मंत्री प्रवीण पोटे यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले. गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सेवेत नसलेल्यांना बडतर्फ करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या दौºयानंतर पाच कनिष्ठ कर्मचाºयांना निलंबित, तर एका कंत्राटी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. मात्र, डेंग्यू आजारवाढीस कारणीभूत ठरलेल्या सीमा नैताम यांना अभय का, असा नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Will the Guardian Minister give the order for the crime of human rights?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.