कोविड रुग्णालयांतील कंत्राटी कर्मचारी होणार कायम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:56+5:302021-06-10T04:09:56+5:30
कॅप्शन - राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केलेले पत्र हालचालींना वेग, आरोग्य विभागाचा पुढाकार, महापालिका आयुक्तांना पत्र कॉमन गणेश वासनिक ...
कॅप्शन - राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केलेले पत्र
हालचालींना वेग, आरोग्य विभागाचा पुढाकार, महापालिका आयुक्तांना पत्र
कॉमन
गणेश वासनिक (पत्र घेणे )
अमरावती : गतवर्षी मार्चपासून कोविड-१९ च्या काळात कंत्राटी पद्धतीेने शासकीय रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये अहोरात्र सेवा बजावणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा चालविला आहे.
नगरविकास विभागाने ३ जून २०२१ रोजी राज्याचे सर्व महापालिका आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा संचालकांना कोरोना रुग्णालयांत उत्तम आणि अविरतपणे सेवा देणारे कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत कळविले आहे. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या अवर सचिवांच्या पत्राचा दाखला देण्यात आला आहे. कल्याण-पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी २३ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोविड-१९ च्या काळात कंत्राटी पद्धतीेने आरोग्य सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारे हद्यस्पर्शी पत्र लिहिले होते. आ. गायकवाड यांच्या पत्राचा आधारही आरोग्य विभागाने घेतला असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी प्रशासकीय प्रवास सुरू झाला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर कोरोना रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम होण्याची संधी मिळेल, असे संकेत आहेत.
----------------
कंत्राटींच्या सेवेने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी
सार्वजनिक आरोग्य विभागात हजारो पदे रिक्त आहेत. गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. राज्य शासनाने डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने भरती केली. या कंत्राटींनी अतिशय तन्मयतेने कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना रूग्णांना भरती करणे, औधषोपचारपासून तर अंत्यविधीपर्यंतची कामे केली आहेत. आजतागायत हे कंत्राटी सेवा बजावत आहे. कोविड-१९ च्या काळात कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले नसते, तर आराेग्य यंत्रणेचा पुरता बाेजवारा उडाला असता, हे वास्तव आहे.
-------------
कोट
कोविड-१९ च्या काळात शासकीय रुग्णालयांत सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करताना प्राधान्य राहील. मात्र, तूर्त अशा प्रकारचे कोणतेही शासनाचे पत्र प्राप्त झालेले नाही. तशा काही गाईडलाईन आल्यास नक्कीच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेतले जाईल.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.