हा तर राष्ट्रसंतांच्या इच्छाहेतूचाच सफाया!

By admin | Published: February 21, 2016 12:09 AM2016-02-21T00:09:31+5:302016-02-21T00:09:31+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो राष्ट्रधर्म मांडला तो राष्ट्रभर प्रचारित व्हावा, या महत्त्वपूर्ण उद्देशाने खुद्द महाराजांनीच आश्रमाची स्थापना राष्ट्रीय महामार्गालगत केली होती.

This is the will of the nationalities wished! | हा तर राष्ट्रसंतांच्या इच्छाहेतूचाच सफाया!

हा तर राष्ट्रसंतांच्या इच्छाहेतूचाच सफाया!

Next

गावकऱ्यांचा विरोध : गुरुकुंज मोझरीच्या अस्तित्वावर घाला
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो राष्ट्रधर्म मांडला तो राष्ट्रभर प्रचारित व्हावा, या महत्त्वपूर्ण उद्देशाने खुद्द महाराजांनीच आश्रमाची स्थापना राष्ट्रीय महामार्गालगत केली होती. वळणरस्त्याच्या निर्णयाआडून आता महाराजांच्या मूळ हेतुचाच सफाया केला जाणार आहे. महाराजांच्या इच्छेचा अनादर करणारे हे कृत्य असणार आहे. काही विघ्नसंतोषी लोकांच्या कारवायांमुळे हे घडू शकले. गुरुकुंज मोझरी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तडकाफडकी गावाबाहेरून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोलकाता-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने अनेक गावांमधून जाणाऱ्या या महामार्गावर गावोगावी उड्डाण पूल उभारले गेले आहेत. तसाच उड्डाणपूल गुरुकुंज-मोझरी गावातदेखील नियोजित आहे.
तथापि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम आणि समाधी या पवित्र स्थळांचा आडोसा घेत प्रस्तावित उड्डाणपुलाला काही विघ्नसंतोषींनी विरोध केला. हा सारा विषय राष्ट्रसंतांशी आणि परिणामी लोकभावनेशी निगडित असल्याने अवघे प्रशासन आणि कंत्राटदारही चार पावले मागे येत असल्याचे जाणवते.
गावातून जाणाऱ्या उड्डाण पुलाऐवजी गावाबाहेरून जाणाऱ्या सहा किमी लांबीच्या वळण रस्त्याचा पर्याय पुढे आला आहे. यदाकदाचित हा वळण रस्ता अस्तित्वात आला तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, वेगवान होईल, काही लोक जे वळण रस्त्याचा आग्रह धरत आहेत, ते खूश होतील.
कदाचित आपले राजकारण यशस्वी झाल्याचा आनंददेखील ते काही काळ साजरा करतील. पण, गुरुकुंज मोझरीच्या गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाच्या वेदनांवर हा आनंद अंकुरीत झालेला असेल.
आज गुरुकुंज मोझरी हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव आहे. त्याचमुळे या गावात जिवंतपणा आहे. वाहनांची-लोकांची वर्दळ आहे. राष्ट्रसंतांचा आश्रम आणि समाधीस्थळ महामार्गालगत असल्याने सर्वसामान्यांना महासमाधीचे दर्शन सहज उपलब्ध आहे. या महामार्गामुळेच मोझरीशिवाय पंचक्रोशीतील पाच-पन्नास गावचे लोक परिसराशी जुळलेले आहेत. महामार्गावरील प्रवासी, देश-विदेशातून या परिसरात येणारे पर्यटक यांना राष्ट्रसंत आणि त्यांच्या कार्याबद्दल आस्था, जिव्हाळा आहे. काही वर्षांत या गावात जी विकासकामे उभी झालीत, त्यामुळे हे गाव आता ग्रामीण आपुलकी जपलेल्या छोट्याशा शहरात रुपांतरित झाले आहे. गावातून जाणाऱ्या महामार्गामुळेच हे सारे शक्य झाले आहे.
-तर मोझरीचे अस्तित्त्वच संपणार!
हा महामार्ग गावाबाहेरुन वळण रस्त्याच्या स्वरुपाने अस्तित्वात आला तर काय होईल? या प्रकरणाचे गंभीर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणाम होणार आहेत. आज गावात वर्दळ असल्याने येथील व्यापार वाढला आहे. गाव महामार्गावर असल्याने आणि अमरावती शहराला जवळ असल्याने येथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्ग नसेल तर आर्थिक विकासाच्या या साऱ्या संधी संपुष्टात येतील. राष्ट्रसंतांच्या राष्ट्रधर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या केंद्रांच्या अभ्यागतांवर विपरीत परिणाम होईल. राष्ट्रधर्माची शिकवण देणारी ही केंद्रे ओस पडतील. राष्ट्रसंतांच्या कार्यालयाला खीळ बसेल. या गावात राष्ट्रसंतांनी महत्प्रयासाने उभे केलेले सामाजिक, सांस्कृतिक वैभव नष्ट होईल. अर्थात् राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून गुरुकुंज मोझरीचे अस्तित्त्वच पुसले जाईल. आज विकासाची आस बाळगून असणारे छोटेखानी गाव पुन्हा एकदा मागासलेपणाच्या गर्तेत लोटले जाईल.
कसदार शेतीही जाणार!
नवीन वळण रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागते. त्यात कसदार जमिनी जातील. शेतकरी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष उभा ठाकेल. आजचे शांततेचे वातावरण बिघडेल. सलोखा समाप्त होईल. सारे वातावरण असंतोषाचे अविश्वासाचे आणि तणावाचे होऊन बसेल. हे सारे टाळण्यासाठी गुरुकुंज-मोझरीच्या जीवनात येऊ पाहणारे हे नवे विध्वंसक वळण गर्भावस्थेतच उखडून फेकण्याची गरज आहे.
गुरुकुंज मोझरीच्या अस्तित्त्वावर घाला घालणाऱ्या या संकटाचा सामना आता गुरुकुंज-मोझरीवासीयांनाच करावा लागणार आहे.
४भय्यासाहेब ठाकूर
माजी आमदार, तिवसा.

Web Title: This is the will of the nationalities wished!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.