सहा वर्षांपर्यंत बदली होणार नाही
By admin | Published: April 12, 2015 12:32 AM2015-04-12T00:32:42+5:302015-04-12T00:32:42+5:30
केंद्रीय कृषी संचालक डी. के. शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, महापौर रिना नंदा, मधुकरराव किंमतकर, कृषी शास्त्रज्ञ...
अमरावती : केंद्रीय कृषी संचालक डी. के. शर्मा, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, महापौर रिना नंदा, मधुकरराव किंमतकर, कृषी शास्त्रज्ञ सी. डी. मायी, गिरीश गांधी, सोमेश्वर पुसदकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, चंद्रकांत कलोती उपस्थित होते.
नवीन अधिकाऱ्यांची विदर्भात नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ६ वर्षे बदली होणार नाही, अधिकाऱ्यांचे प्रमोशन पाहिजे असेल तर स्थानांतर विदर्भात व नंतर मराठवाड्यात होईल. त्यांनी प्रमोशन नाकारले तर त्यांना पुढील ३ वर्षे प्रमोशन नाही. अधिकाऱ्यांची एकाच भागात राहायची मानसिकता असल्याने प्रशासकीय धोरणात बदल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अमरावती पंचतारांकित एमआयडीसीमध्ये टेक्सटाईलचे दोन कारखाने सुरू आहेत. पुढील १५ ते २० दिवसांत आणखी एका कारखान्याच्या उद्घाटनाला आपण येणार आहोत. येत्या दोन महिन्यांत आणखी ८ नवीन युनिट येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत एनटीसीच्या अनेक गिरण्या बंद आहे. विदर्भ व मराठवाड्यात गिरण्या उभारणीच्या अटीवर त्यांना जागा विकण्याची परवानगी देण्यात येईल. सध्या ४ गिरण्या उभारण्याची तयारी एनटीसीने दाखविली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन पीक घेतो. हा कापूस आठ प्रक्रियेतून जातो, मात्र त्या प्रक्रिया तयार केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही यासाठी पणन विभागाद्वारा ‘व्हॉल चेन’ तयार करण्यात येत आहे. जिथे पिकतो त्याच ठिकाणी कृषी मालावर प्रक्रिया केली गेली पाहिजे, तरच शेतमालास बाजारभाव मिळून रोजगाराची निर्मिती होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विदर्भातील शेतकरी आत्महत्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अनेक शेतकरी मनोवैज्ञानिक दबावात आहेत. यामधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्यात येणार आहे. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची माहिती घेतली जात आहे. यामुळे योग्य व्यक्तीलाच पॅकेजचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भातील अनेक प्रकल्प पडून आहे. कारंज्याचा प्रकल्प महाआॅरेंजने घेतला. विकास साधायचा असेल तर शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावापर्यंत योजना आणाव्यात, असे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांविषयी बोलताना परिवहन मंत्री म्हणाले, सोयाबीन निर्यात झाल्यानंतर भाव कोसळतात. कापसाचा मोठा ग्राहक देश चीन पुढील तीन वर्षे कापूस घेणार नाही, ४० टक्के बांग्लादेश घेतो तोदेखील पुढे घेणार आहे. त्यामुळे कृषी खात्याला याविषयी निर्णय घ्यावा लागणार आहे, निसर्ग कोपला आहे, हजारो हातांचा रोजगार हिरावणाऱ्या मशिनी आम्हाला नको आहेत, असे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमेश्वर पुसदकर यांनी केले. संचालन व आभार नितीन जगदळे यांनी केले.
किसान एकता मंचाची नारेबाजी
मुख्यमंत्री शेतकरी आत्महत्याविषयी बोलत असताना प्रेक्षकांत बसलेल्या किसान एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फडकवीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, अशी नारेबाजी केली. यावर तुमची मागणी मला कळली यावर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी केली प्रदर्शनीची पाहणी
कृषी विकास प्रदर्शनीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. बचतगटांच्या स्टॉलला भेट देऊन वस्तूची माहिती जाणून घेतली. प्रगत कृषी तंत्राची प्रात्यक्षिक पाहिले तसेच प्रदर्शनीत ग्रामीण भागाची फलक जागोजागी असल्याचे कौतुक केले.