ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 07:15 AM2022-03-24T07:15:00+5:302022-03-24T07:15:02+5:30

Amravati News मेळघाटातील सेमाडोह येथील सेमलकर परिवाराने हिंदू-मुस्लिम सलोख्याचा अनोखा परिचय दिला. त्यांनी चक्क आपल्या घरावरील छतावर सातशेपेक्षा अधिक मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.

Will not become a Hindu, will not become a Muslim, will become a human being, will become a human being ...... | ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा......

ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है इन्सान बनेगा......

googlenewsNext
ठळक मुद्दे घराच्या छतावर ७०० मुस्लिम बांधवांकडून नमाज पठणसेमलकर कुटुंबाचा पुढाकार; मेळघाटात हिंदू-मुस्लिम बंधुतेचा परिचय

नरेंद्र जावरे

अमरावती : कथित ‘फाईल्स’ पेरून जातीय तेढ, द्वेषभावना, परस्परविरोधी मतभेदाचे पीक कापण्याच्या काळात मेळघाटातील सेमाडोह येथील सेमलकर परिवाराने हिंदू-मुस्लिम सलोख्याचा अनोखा परिचय दिला. नमाज पठण करण्यासाठी जंगलात जागा मिळत नसल्याचे पाहून त्यांनी चक्क आपल्या घरावरील छतावर सातशेपेक्षा अधिक मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. जिल्हाभरातील हे मुस्लिम बांधव धारणी येथे एका कार्यक्रमातून परत जात होते. या घटनेनंतर सेमलकर कुटुंब कौतुकाचा विषय ठरले आहे.

जिल्ह्यातील तबलिगी जमातीच्या मुस्लिम बांधवांचा धारणी येथे कळमखार मार्गावरील दारुल उलूम येथे मंगळवारी दिवसभर ‘मशवरा’ होता. त्यासाठी जिल्हाभरातील १२०० हून अधिक मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. एका गावातून किमान सहा ते दहा बांधवांना बोलावण्यात आले होते. रमजान महिन्यातील कार्यक्रमासंदर्भात या ‘मशवरा’चे आयोजन केले जाते. परतीच्या वेळेला सायंकाळची नमाज पठण करण्यासाठी धारणी-परतवाडा मार्गातील घनदाट जंगलामुळे वेळ पाहता काही बांधवांनी सेमाडोह येथे थांबा घेतला होता.

सेमलकर कुटुंबाची धर्मनिरपेक्षता

सेमाडोह येथे प्रदीप सेमलकर हे मार्गावर तबलिगींना उभे दिसले. काही जणांनी त्यांना नमाज पठण करण्यासाठी जागा देता का, अशी विचारणा केली आणि क्षणाचा विलंब न करता घराच्या छतावर चटई टाकली. हात-पाय धुण्यासाठी, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली. प्रदीप सेमलकर, पत्नी अनामिका, मुलगा प्रिन्स, मुलगी मनाली, भाऊ जगदीश, आई भागीरथी सेमलकर यांनी त्यांचे स्वागत केले. चारचाकी वाहने एका मागोमाग थांबत होती आणि नमाज पठण करून मुस्लिम बांधव पुढे जात होते.

सुगंधी अत्तर भेट आणि आभार

नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी चर्चा करीत सेमलकर परिवाराला सुगंधी अत्तर भेट दिले आणि दिलेल्या सहकार्याबद्दल आभारही मानले.

 

नेहमीप्रमाणे घरापुढे उभा होतो. काही मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करण्यासाठी जागा मिळेल का, अशी विचारणा केली आणि होकार दिला. सातशेवर बांधवांनी घराच्या छतावर नमाज अदा केली.

- प्रदीप सेमलकर, सेमाडोह

तबलिगींचा ‘मशवरा’ धारणी येथे मंगळवारी घेण्यात आला. परतीच्या प्रवासात नमाजाची वेळ झाली. सेमाडोह येथे नमाज व्यवस्था प्रदीप सेमलकर या हिंदू भावाने घराच्या छतावर करून दिली. त्यांच्या आदरातिथ्याने सर्वजण भारावलो.

- मौलाना सय्यद सलीम नजवी, संचालक, दारुल उलूम, धारणी

Web Title: Will not become a Hindu, will not become a Muslim, will become a human being, will become a human being ......

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.