महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही- यशोमती ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 09:03 PM2020-07-30T21:03:31+5:302020-07-30T21:05:01+5:30
पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब बसवावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी येथे दिले.
बडनेरा : मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली. असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब बसवावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी येथे दिले.
तरुणीच्या गुप्तांगातून घेतलेला स्वॅब पोलिसांनी जप्त केला असून, आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेवर पालकमंत्री, खासदार तसेच विविध पक्षांतर्फे संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील २४ वर्षीय तरुणीचा बडने-यातील कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याबाबत प्रथम 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हादरली. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. २८ जुलै रोजी सदर प्रकार घडला. उशिरा रात्री बडनेरा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. आरोपी अल्पेश देशमुख याला अटकदेखील झाली. तरुणीचा घेण्यात आलेला गुप्तांगातील स्वॅब पोलिसांनी तपासातील कामकाजासाठी जप्त केला आहे. घटनेच्या वेळी लॅबमध्ये उपस्थित असलेल्या इतर कर्मचा-यांचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी दिली. आरोपी अल्पेश देशमुख याला न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संतापजनक प्रकारामुळे शहरात दुस-या दिवशी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. बडनेरा स्थित ट्रामा केअरमधील टेस्टिंग लॅबची दोन नगरसेवकांकडून गुरुवारी तोडफोड करण्यात आली.
बडनेºयात अत्यंत घृणास्पद निंदनीय असे कृत्य घडले. गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी. सदर व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून अटक केली आहे. यापुढे असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहे.
- यशोमती ठाकूर,
महिला व बालकल्याण मंत्री
---------------------
अंबानगरीत एका तरुणीसोबत थ्रोट स्वॅब तपासणीच्या नावाखाली घडलेला हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. ही बाब दुर्देवी आहे. महिलांच्या थ्रोट स्वॅब तपासणीसाठी महिला कर्मचारीच असावे. आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेन.
- नवनीत राणा,
खासदार, अमरावती
बडनेºयात घडलेली घटना निंदणीय आहे. माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
- चेतन गावंडे,
महापौर, अमरावती