निवडणुकीत महायुतीसोबत राहणार का? बच्चू कडूंचं भविष्याबद्दल सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 03:26 PM2023-03-19T15:26:56+5:302023-03-19T15:27:57+5:30
राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत दररोजच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.
राज्याच्या राजकारण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलंय. सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पूर्ण झाली आहे. आता, न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. त्यातच, शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगणार असल्याचं दिसून येतेय. आगामी निवडणुकांसाठी तुम्ही भाजप आणि शिंदे गटांना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असा सवाल आमदार कडू यांना विचारला होता. त्यावर, उत्तर देताना बच्चू कडू यांनी इतिहास दाखवत भविष्यावर सूचक विधान केलंय.
राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत दररोजच वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून, शिंदे गट आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावरही टीका केली होती. अनेकदा बच्चू कडूंनाही टार्गेट केलं जात आहे. मात्र, मंत्रीपदाच्या शर्यतीत असतानाही आमदार कडू यांना न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगतेय. त्यातूनच, आगामी निवडणुकीत बच्चू कडू महायुतीत असणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पुढील १.५ वर्षात काय होईल हेच सांगता येत नाही, असे आमदार कडू यांनी म्हटलंय.
आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काहीही ठरलेलं नाही. आगामी काळात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच, पुढच्या दीड वर्षात काय होणार हे काही आताच सांगता येणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले. तीन वेळा शपथविधी झाले. त्यामुळे पुढल्या दीड वर्षात काय होणार हे आताच सांगता येत नाही, असंही कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळ यांनी शिंदे गटाला ऑफर केलेल्या जागांबाबत विचारलं असता, हे विधान त्यांनी चुकून केलं का, भाजपची हीच भूमिका आहे का, हेही तपासलं पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
अंधारे विरुद्ध कडू यांच्यात टीकास्त्र
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार बच्चू कडूंवर प्रहार केला होता. देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत, अशी अंधारे यांनी केली होती. आमचे नाव प्रहार आहे. आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जात नाही, असा पलटवार कडू यांनी केला होता.