हत्ती डुंबणार का पावसात? मृग नक्षत्राला उद्यापासून प्रारंभ
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 6, 2023 04:37 PM2023-06-06T16:37:06+5:302023-06-06T16:37:21+5:30
हवामान विभाग म्हणते मान्सूनचे आगमन उशीरा
अमरावती : मृग अन् पाऊस हे समीकरणच अलीकडच्या काळात बिघडलेलं आहे. दरवर्षीच मान्सूनचे आगमन उशिरा होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी आश्वासक नजरेने पाहत असलेल्या मृग नक्षत्राला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. संपन्नतेचे प्रतीक मानल्या जाणारा हत्ती हे यावेळी मृगाचे वाहन आहे. त्यामुळे हत्ती पावसात डुंबणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागात पंचाग, पावसाचे नक्षत्र व त्याचे पाहून ठोकटाळे बांधले जातात. त्यातही जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्र जिरायती असल्याने पेरणी व पीक हे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे रोहिणीमधील उन्हाच्या झळापश्चात वातावरणात गारवा घेऊन मृगाचे आगमन होत आहे.
यंदा ८ जूनला सायंकाळी ६.५२ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेशित होत आहे. या नक्षत्र काळात दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होईल असे पंचागकर्त्यांनी म्हटले आहे. हवामान विभागाद्वारा मात्र, मान्सूनचे आगमन चार- पाच दिवस विलंबाने होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.