दिवाळीला नेणार का घरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:53 PM2018-11-02T21:53:38+5:302018-11-02T21:54:19+5:30
ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजामय केले, त्यांनाच कुलदीपक विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचेही दर्शन घडत नाही. दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील, अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्त करीत आहेत.
सूरज दाहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : ज्या जन्मदात्यांनी आयुष्य दिले, जीवन तेजामय केले, त्यांनाच कुलदीपक विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिणमिणत्या पणतीचेही दर्शन घडत नाही. दिवाळीच्या पर्वावर तरी आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील, अशी अपेक्षा वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापित केलेल्या गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमात ४० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. यांसह जिल्ह्यात एकूण आठ वृद्धाश्रम आहेत. पोटच्या गोळ्याने नाकारल्याने अनेकांची रवानगी तेथे झाली आहे. ते आश्रमात अखेरचा घटका मोजत आहेत. दिवाळीला सोमवारी वसुबारसपासून सुरुवात होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर काही वृद्धाश्रमातील आई-वडिलांशी संवाद साधला असता, आयुष्यात किती कष्ट सोसले, याची गणित त्यांनी मांडले. त्यापैकी कुलदीपकांसाठी खाल्लेल्या खस्ता वजाबाकीच्या खात्यात होत्या. कुटुंबापासून दुरावलो असलो तरी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची इच्छा यापैकी अनेकींनी व्यक्त केली.
श्रीगुरुदेव सेवा मंडळाची दिवाळी
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने स्थापित केलेल्या वृद्धाश्रमातच या वृद्धांची दिवाळी साजरी होईल. यानिमित्त त्यांना नवे वस्त्र, पंचपक्वान्नाचे ताट वाढले जाते. या सणप्रसंगी त्यांना आनंदी ठेवता यावे, हा यामागे उद्देश असतो.
आयुष्याची सायंकाळ वृद्धाश्रमात
ज्यांनी तळहातावर चटके झेलत पोटच्या गोळ्याला मोठे केले, त्यांना वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळी दिवस कंठण्याची वेळ आली आहे. चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा, फटाके कसे लावायचे, या गोष्टी जन्मदात्यांनी शिकविल्या. त्यांची दिवाळी वृद्धाश्रमात जात आहे.
कुलदीपक कधी देणार वेळ ?
मुलाचा जन्म हा आईचा पुनर्जन्म असतो. आयुष्याचा आधार मिळेल, मृत्यूनंतर त्यांच्या खांद्यावर यात्रा पूर्ण होईल, अशी आशा प्रत्येक आई-वडिलांची असते. परंतु, त्यांनीच वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला. वर्षातून केवळ दहा मिनिटे भेटायला येतात. नातवंडांना खांद्यावर खेळवण्याऐवजी अश्रू ढाळण्यातच दिवस जात आहेत, अशी कैफियत एका वृद्धेने मांडली.