वादळी पाऊस : छत उडाले; १५०० कोंबड्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:09 AM2019-06-08T01:09:43+5:302019-06-08T01:10:26+5:30
अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी पावसात अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या घरावरील छत उडाले. वादळाचा वेग जास्त असल्यामुळे घरावरील लोखंडी अँगलसकट सर्व टीन उखडून उलटे झालेत.
परतवाडा : अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी पावसात अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या घरावरील छत उडाले. वादळाचा वेग जास्त असल्यामुळे घरावरील लोखंडी अँगलसकट सर्व टीन उखडून उलटे झालेत.
काकडा येथील प्रमोद गिरी यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेड व भिंत कोसळल्यामुळे यात १५०० कोंबड्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळात परतवाडा-अमरावती मार्गावर भुगावलगत एमएच ४० एन- ८६३९ क्रमांकाच्या एसटी बसवर अचानक झाड कोसळले. बसवर झाड कोसळताच मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या स्थितीत प्रवाशी बसबाहेर पडलेत. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
परतवाडा शहरातील एलआयसी चौकात मोठे कडुनिंबाचे झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. जुळ्या शहरांच्या आसमंतात काळे ढग शुक्रवारीही होते. अधून-मधून हलक्या सरींनी मान्सूनची वर्दी दिली.