तीन तालुक्यांत वादळी पाऊस

By admin | Published: May 9, 2017 12:02 AM2017-05-09T00:02:39+5:302017-05-09T00:02:39+5:30

सोमवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्याच्या काही भागात धुमाकूळ घातला.

Windy rain in three talukas | तीन तालुक्यांत वादळी पाऊस

तीन तालुक्यांत वादळी पाऊस

Next

धारणी मार्ग ठप्प : अचलपुरात झाडे उन्मळली, दर्यापुरात १५ मिनिटे पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोमवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्याच्या काही भागात धुमाकूळ घातला. अचलपूर, धारणी आणि दर्यापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्याने अचलपूर तालुक्यातील धारणी मार्गावर दोन कडूनिंबाची झाडे उन्मळून पडली. परिणामी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर ढगाळ वातावरण पाहता येथील बाजार समितीच्या आवारातील २० हजार क्विंटल तूर पावसाच्या भीतीने मार्केट यार्डसह उघड्यावरच झाकून ठेवण्यात आली आहे.
अचलपुरात सोमवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला. अचानक ढगाळ वातावरण झाल्याने सर्वत्र धावपळ सुरू झाली होती. धारणी मार्गावरील विश्रामगृह आणि पेट्रोल पंपानजीक कडूनिंबाची दोन भव्य झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. हा मार्ग जवळपास दीड तास ठप्प झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्यावर पडलेली झाडे कापून बाजूला करण्यात आली. वादळामुळे जुळ्या शहरातील अनेक भागांचा विद्युत पुरवठा तीन तासांपासून खंडित झाला होता. दर्यापूर तालुक्यात वेगवान वाऱ्यासह सायंकाळी सलग १५ मिनिटे पाऊस बरसला. मात्र, कोठेही पडझड किंवा हानीचे वृत्त नाही.

४८ तासांत तापमानात वाढ
अमरावती : येत्या ४८ तासांत कमाल तापमान २ डिग्रीने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच विदर्भातील काही ठिकाणी हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
उन्हाळ्यात वातावरणात अकस्मात बदल झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, येत्या ४८ तासांत तापमान २ डिग्री सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकीकडे उन्हाचा प्रकोप, तर दुसरीकडे वादळी पावसाचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार असून यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. रविवारी वादळी वाऱ्यामुळे शहरातील काही ठिकाणी वृक्ष व सरंक्षण भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी देखील जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. रविवारी शहरातील सिद्धार्थनगरातील उद्यानात वृक्ष कोसळून १२ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली तर तिच्यासोबत बागेत खेळणाऱ्या दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे. नागपुरी गेट परिसरातील एका घराची सरंक्षण भिंत कोसळली. मात्र, कोणतीही हानी झाली नाही.

अचलपूर बाजार
समितीमध्ये खळबळ
अचलपूर बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे खरेदीसाठी मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली २० हजार क्विंटल तूर उघड्यावर नवीन ताडपत्र्या टाकून झाकण्यात आली तर काही मार्केट यार्डमध्ये ठेवण्यात आली. जवळपास ५४ हजार क्विंटल तूर असल्याचा पंचनामा करण्यात आला असून मोजणी झालेली तसेच बाहेरील तूर मोजून धामणगाव रेल्वे येथे नेण्यात येत असल्याची माहिती बाजार समिती संचालक पोपट घोडेराव यांनी दिली.

परतवाडा-सावळी अंधारात
वादळी वाऱ्यामुळे परतवाडा-अचलपूर मार्गावरील गाडगेबाबा पाणेरीनजीकच्या ११ केव्ही विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे परतवाडा शहरासह सावळी दातुरा गावाचा विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. वीज तारा दुरूस्तीचे काम सुरू होते.
धारणीत भुईमूगाची हानी
धारणीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठी हानी झाली नाही. मात्र, शेतात असलेल्या रबीच्या भुईमूग पिकाला वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Web Title: Windy rain in three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.