मृगाच्या मुहूर्तावर वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:04 AM2019-06-10T01:04:26+5:302019-06-10T01:05:32+5:30
शनिवारी मृगाचा मुहूर्तावर पावसासह शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावलेल्या वादळाने कहर केला. धामणगाव रेल्वे तालुक्यात शंभर घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. अमरावतीलाही पावसाने झोडपून काढले.
अमरावती : शनिवारी मृगाचा मुहूर्तावर पावसासह शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावलेल्या वादळाने कहर केला. धामणगाव रेल्वे तालुक्यात शंभर घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. अमरावतीलाही पावसाने झोडपून काढले. झाडे वीज वाहिन्यांवर कोसळल्याने अर्धेअधिक शहर अंधारात होते. जिल्ह्यात ८० ते ९० गावे अंधारात असल्याची माहिती पुढे आली आहे.
उपाययोजनेत हलगर्जीपणा
ज्या वृक्षांच्या फांद्या महावितरणच्या विद्युत तारेवरून गेल्या आहेत, त्या प्री-मान्सूनपूर्वी त्या तोडून बाजूला करण्याचे कामे करायला हवी होती. काही प्रभागात सदर कामे करण्यात आली, तर काही प्रभागात करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. शहरात वादळी पाऊस आल्यानंतर जे संकट आले, त्याला तातडीने समोरे जाण्यासाठी महावितरणकडे पुरेसा मनुष्यबळ नसल्याने नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली. रविवारी दुपारी अनेक भागात वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांची ओरड वाढली होती.
३३ व ११ केव्ही पुरवठा बंद
वादळी पावसाची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांना मिळताच शहरातील ११ व ३३ केव्हीवरील विद्युत पुरवठा तातडीने बंद केला. जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन कुठलीही मनुष्यहानी वा अनुुचित घटना घडू नये म्हणून सदर पाऊल उचलण्यात येत असल्याचे विद्युत विभागाने स्पष्ट केले. कुठे कुठे तारा तुटल्या आहेत, यासंदर्भाचे सर्वेक्षण करण्यात आले. पहाटे ४ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात आली. रविवारी सकाळी ८ नंतर कामे करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड यांनी दिली आहे.