‘मदिरा’झाली दुर्लभ, मद्यपी सैरभैर

By admin | Published: April 11, 2017 12:19 AM2017-04-11T00:19:35+5:302017-04-11T00:19:35+5:30

महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतक्या शिल्लक राहिलेल्या दारू दुकानांमध्ये दारूड्यांची गर्दी उसळत आहे.

'Wines' is rare, alcoholic, but rare | ‘मदिरा’झाली दुर्लभ, मद्यपी सैरभैर

‘मदिरा’झाली दुर्लभ, मद्यपी सैरभैर

Next

अमरावती : महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतक्या शिल्लक राहिलेल्या दारू दुकानांमध्ये दारूड्यांची गर्दी उसळत आहे. एकूणच दारूबंदीच्या या निर्णयामुळे मद्यपी ‘आऊट आॅफ कंट्रोल’ झाल्याचे चित्र आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आता केवळ १२६ दारू दुकाने सुरू आहेत. तुलनेत दारूड्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक असल्याने या बोटावर मोजण्याइतक्या दुकानांमध्ये तुफान गर्दी उसळली आहे. एरवी अगदी सहज मिळणारी मदिरा मिळविण्यासाठी मद्यपींना जीवाचे रान करावे लागत आहे. मद्यविक्रीसंदर्भात दररोज विविध समस्या पुढे येत असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा हतबल झाला आहे.
जिल्ह्यातील महामार्गांवर आतापर्यंत ४८२ दारूची दुकाने होती. त्यामध्ये बार, देशी दारूविक्री, बिअर शॉपी, बार यांचा समावेश होता. महामार्गापासून ५०० मीटरच्या आत दारू दुकाने असू नयेत, असा निर्णय न्यायालयाने दिल्यामुळे निकषात न बसणारी जिल्ह्यातील तब्बल ३८२ दुकाने बंद झालीत. या नव्या निकषामुळे शहरी भागातील १४७ दुकानांपैकी १२० दुकाने बंद झाल्यामुळे आता केवळ २६ दुकानांमधून दारूची विक्री सुरू आहे. इतक्या मोठ्या संख्येने मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्याने पूर्वी अगदी सुलभरित्या कोठेही उपलब्ध होऊ शकणारी दारू मिळविण्यासाठी मद्यपींना आता जीवाचे रान करावे लागत आहे.

मद्य पिणाऱ्यांची बिअर शॉपीवर खैर नाही
अमरावती : यापूर्वी जिल्ह्यात महिन्याकाठी तब्बल १३ लाख ५० हजार बल्क लीटर दारूची विक्री होत होती. मात्र, दुकाने बंद झाल्याने दारूविक्रीत मोठी घट झाली असून शासनाचा महसूल बुडत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात ‘दारूटंचाई’सदृश स्थिती निर्माण झाल्याने मद्यप्रेमी बेचैन झाले आहेत. हायवेवरील दारू दुकाने बंद झाल्याने अंतर्गत दारू दुकानांकडे आता मद्यपींनी मोर्चा वळविला आहे. त्यामुळे शासन नियमांच्या कचाट्यातून सुखरूप बचावलेल्या दुकानांमध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळली आहे. दुकानदारही त्यामुळे हैराण झाले असून मद्यपींच्या गर्दीमुळे कित्येक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांची जबाबदारीही वाढली आहे.
कित्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत आहे. दारूच्या टंचाईमुळे अवैध दारूविक्रीला प्रचंड उधाण आले आहे. गावठी दारू जादा दराने सर्रास विकली जात आहे. यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला याकडे विशेष लक्ष केंद्रीत करावे लागत आहे.
बिअर शॉपीवर मद्यपींची प्रचंड गर्दी होत आहे. बिअर शॉपीतून मद्य खरेदी केल्यानंतर तेथेच बसून दारू रिचवण्याचे प्रकार काही ठिकाणी सुरु आहेत. यागैरप्रकारावर आता पोलीस लक्ष ठेऊन आहेत. अशा बिअर शॉपी पोलिसांच्या ‘टार्गेट’ असून बिअर शॉपीमध्ये मद्य पिणाऱ्यांसह संचालकांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. याकरिता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विशेष ‘स्कॉड’ तयार केला असून तो बिअर शॉपीवर लक्ष ठेऊन राहणार आहे.

या क्रमांकांवर करा संपर्क
आपल्या परिसरात हातभट्टी, अवैध देशी/विदेशी दारू, बनावट दारू, परराज्यातील दारु, वाहतूक, साठवण किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून दारूचे समूळ उच्चाटन होण्यास मदत मिळू शकते. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉटस अ‍ॅप क्रमांक ८४२२००११३३, टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ किंवा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२६६३४१० वर संपर्क करावा. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील. त्यामुळे यासंदर्भात माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

एक्साईज हतबल : १२६ दुकाने, लाखो ग्राहक, अवैध विक्रीला उधाण
मनुष्यबळाचा अभाव, कारवाई थंडबस्त्यात
यानिर्णयानंतर अवैध दारुविक्रीचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील काही बार अ‍ॅन्ड रेस्टारेंट्समध्ये छुप्या मार्गाने मद्यविक्री सुरूच आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग तत्पर असला तरी पुरेशा मनुष्यबळाअभावी अनेक ठिकाणी कारवाई करणे शक्य होत नाही. एक्साईजमध्ये निरीक्षकाचे एक पद रिक्त असून केवळ दोन दुय्यम निरीक्षकांची पदे भरलेली आहेत.जिल्ह्यातील अवैध दारुविक्री रोखण्यासाठी भरारी पथक असले तरी यापथकातही निरीक्षकाचे एक पद रिक्त आहे.

दुकानांपुढे मद्यप्रेमींच्या रांगा
जिल्ह्यात केवळ १२६ दुकानांमधून सध्या मद्यविक्री सुरु आहे. तुलनेने मद्यपींची संख्या प्रचंड मोठी असल्याने सगळ्यांना दारू मिळेलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे मदिराप्रेमी चक्क पहाटेपासून दुकानांपुढे रांगा लाऊन दारू खरेदी करीत आहेत. ऐनवेळी पंचाईत होऊ नये, यासाठी मद्यपी अतिरिक्त कोटा खरेदी करीत आहेत.मागणी वाढल्याने कित्येक दुकानांमध्ये मद्यटंचाईचे चित्र दिसून येत आहे.

महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर अवैध दारूविक्री वाढली असून याकडे आता लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अंतर्गत वस्तीतील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढल्याने स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
-प्रमोद सोनोने,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

Web Title: 'Wines' is rare, alcoholic, but rare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.