‘त्या’ एका पत्राने निर्णय पलटला दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2022 12:17 AM2022-10-05T00:17:34+5:302022-10-05T00:18:17+5:30

संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट पत्र लिहीत आपल्या संतप्त भावना कळवल्या, तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह धरला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा विषय लावून धरला होता. अखेर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्याने शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली.

With a letter from 'that', the decision was reversed and the panel of Dashasutri appeared again | ‘त्या’ एका पत्राने निर्णय पलटला दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला

‘त्या’ एका पत्राने निर्णय पलटला दशसूत्रीचा फलक पुन्हा झळकला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केवळ द्वेषपूर्ण भावनेतून एकाएकी मंत्रालयातून हटविण्यात आलेला संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा फलक शिंदे सरकारला पुनर्स्थापित करावा लागला. माजी मंत्री तथा संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या एका पत्रामुळे आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पुढे शिंदे सरकार नरमले असल्याची एकच चर्चा मंत्रालयात आहे.  
महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ‘ईडी’ सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले जनहिताचे निर्णय बदलण्याचा शिंदे सरकारने जणू विडाच उचलला आहे. त्यातच व्यक्तिद्वेषातून म्हणा की अन्य काही कारणाने मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक एकाएकी हटविण्यात आला होता. यामुळे जनतेमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आणि त्याचे पडसाद समाजमाध्यमात उमटू लागले.  
संत गाडगेबाबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छता, समाजप्रबोधन आणि समाजकार्यासाठी अर्पित केले. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा लावलेला फलक हटविल्याची बातमी समजताच संत गाडगेबाबा मिशन मुंबईच्या अध्यक्षा तथा काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी या कृती विरोधात आवाज उठवला. संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमी अमरावती जिल्ह्याचे त्या प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांनी त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट पत्र लिहीत आपल्या संतप्त भावना कळवल्या, तसेच पूर्वीप्रमाणेच तो फलक लावण्याचा आग्रह धरला होता. सोबतच समाजमाध्यमातून हा विषय लावून धरला होता. अखेर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’च्या फलकाचा मुद्दा लावून धरल्याने शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. संत गाडगेबाबांच्या ‘दशसूत्री’चा फलक येत्या दोन दिवसांत नव्याने लागेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख मिटवून मंत्रालयात दशसूत्रीचा फलक त्याच जागी पुनर्स्थापित करण्यात आला. त्यामुळे जनतेच्या प्रातिनिधिक वास्तूत पुन्हा एकदा संत गाडगेबाबांचा विचार तेवत राहील, तोही केवळ ॲड. यशोमती ठाकूर यांच्यामुळे. अखेर एका पत्राने शिंदे सरकारचा निर्णय पलटला आणि मंत्रालयात दशसूत्रीचा फलक लागला.

 

Web Title: With a letter from 'that', the decision was reversed and the panel of Dashasutri appeared again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.