जादा भाडे आकारल्यास परवान्यावर टाच; खासगी बसेसवर आरटीओची नजर
By गणेश वासनिक | Updated: November 7, 2023 16:29 IST2023-11-07T16:28:08+5:302023-11-07T16:29:13+5:30
खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयाच्या परिसरात लावण्याची सक्ती

जादा भाडे आकारल्यास परवान्यावर टाच; खासगी बसेसवर आरटीओची नजर
अमरावती : सणासुदीच्या काळात मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणाहून ये- जा करणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची गर्दी जास्त असल्याचा फायदा घेऊन ट्रॅव्हल्स संचालक तिकीट बुकिंग हाऊसफुल असल्याची शक्कल लढवितात. उत्सव कॅश करण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करून जादा तिकीट दर प्रवाशांकडून आकारतात. मात्र, आता अशा खासगी बसेसवर आरटीओंची करडी नजर असून, आकस्मिक तपासणी मोहीम राबविली जात आहे.
वाहतुकदारांकडून जादा भाडेवाढ आकारण्यात येण्याऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी खासगी कंत्राटी बसेस ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासून किलोमीटर प्रमाणे खासगी बस मालकांनी आकाराव्याचे महत्तम भाडे दराबाबतचा तक्ता व हेल्पलाइन नंबर विहित नमुन्यात लावण्याबाबत खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयाच्या परिसरात लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.
आरटीओची असणार करडी नजर
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक व अधिकारी अनपेक्षितपणे खासगी प्रवासी बसेसच्या कार्यालयांना भेटी देऊन ऑनलाईन आरक्षित केलेल्या तिकिटांचा तपशील त्यांच्या संगणकावर तपासून पाहणार असून ऑफलाइन आरक्षित केलेल्या तिकिटाची खातरजमा करेल. जेणेकरून बुकिंग फुल्ल असल्याचे दर्शविणाऱ्या बुकिंग चालकांच्या शक्कलींना चाप आणि आळा बसेल. तसेच खासगी प्रवासी बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत आता आरटीओ अधिकारी संवाद साधून त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी केल्याबाबतची खातरजमा करणार आहे.
जादा भाडे आकारल्यास येथे करा तक्रार
शासन निर्णयाच्या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बस मालकाविरुद्ध जास्त प्रवासी भाडेवाढ आकारल्यास हेल्पलाइन क्रमांक ०२२ ६२४२६६६६ व rto.27-mh@gov.in या संकेतस्थळावर प्रवाशांनी तक्रार करावी. प्रवाशांनी प्रवासाचे स्वतःचे तिकीट जोडल्यास यावर तत्काळ प्रभावीपणे कार्यवाही करता येईल.
शासन निर्णयानुसार कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडेकर आकारल्यास सदर परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ८६ व इतर अनुषंगिक तरतुदीस अनुसरून कार्यवाही करण्यात येईल.
- राजाभाऊ गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती.