‘विथहेल्ड’ निकाल : विद्यार्थी आक्रमक अन् कर्मचारी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:17+5:302020-12-15T04:30:17+5:30
(फोटो आहेत गर्दी) अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तिसरा आठवडा लोटल्यानंतरही ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम आहे. त्यामुळे सोमवारी ...
(फोटो आहेत गर्दी)
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तिसरा आठवडा लोटल्यानंतरही ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या कायम आहे. त्यामुळे सोमवारी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या गर्दीला यात्रेचे स्वरूप आले होते. गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थी आक्रमक आणि खिडक्यांवरील गर्दी बघून कर्मचारी हतबल झाले. विद्यार्थ्यांच्या गर्दीचा सामना काही काळ परीक्षा संचालकांना करावा लागला, हे विशेष.
अंतिम वर्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका मिळविण्यासाठी १५० ते २०० किमी प्रवास करुन विद्यार्थी विद्यापीठ गाठत आहेत. कोरोना संसर्गामुळे महाविद्यालयांकडून अंतिम वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका पोहोचल्या नसल्याने अशा विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षांचे निकाल ‘विथहेल्ड’मध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका जमा होत आहेत, त्यांचे अंतिम वर्षांचे निकाल जाहीर करून गुणपत्रिका महाविद्यालयात पाठविल्या जात असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली. त्यातच काही महाविद्यालयांनी पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची अंतिम तारीख १७ डिसेंबर ही जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यापीठात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. २० दिवसांपासून गर्दी कायम असतानाही विद्यापीठाकडून कायम स्वरूपी तोडगा काढला गेलेला नाही.
------------------
परीक्षा विभागाचे मुख्य प्रवद्वार बंद
विथहेल्ड निकालाबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या विद्यार्थांच्या गर्दीमुळे परीक्षा विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला सोमवारी कुलूप लावण्यात आले. परीक्षा विभागात जाण्यापासून विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. जुन्या गुणपत्रिका खिडक्यांवरच जमा करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला गेला.
-------------------
विद्यार्थ्यांना कोरोनाची भीती नाहीच
विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालाबाबतची समस्या सोडविण्यासाठी येत असलेले विद्यार्थी कोरोना संसर्गाची जराही भीती बाळगत नसल्याचे चित्र आहे. खिडक्यांवरील रांगेत रेटारेटी आणि परीक्षा विभागात टेबलवरील कर्मचाऱ्यांभोवती गराडा करीत आहे. परीक्षा विभागात आतापर्यंत चार-पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
-------------------
बी.एस्सी. सत्र-४ ची परीक्षा दिली असताना गैरहजर दर्शविले. महाविद्यालयातून परीक्षा उपस्थितीची नोंदणी शीट जमा केली. परीक्षेचा आसन क्रमांक २१२०८ सुद्धा दिला. १५ दिवसांनंतरही निकाल जाहीर झालेला नाही.
- ओम गिरी, विद्यार्थी, बियाणी महाविद्यालय, अमरावती.
-----------
महाविद्यालयात गुणपत्रिका अगोदरच जमा केली. तरीही निकाल जाहीर झाले नाही. नव्या शैक्षणिक सत्रात प्रवेशाची चिंता आहे. सोमवारी पुन्हा गुणपत्रिका विद्यापीठात द्यावी लागली.
- प्रतीक्षा लहाने, विद्यार्थिनी, बीएसपी महाविद्यालय, परतवाडा.