एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयात पानही हालत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:17 AM2021-08-19T04:17:06+5:302021-08-19T04:17:06+5:30
अमरावती/ संदीप मानकर (असायमेंट) आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करण्यासाठी ऑनलाईन सुविधांसह अनेक उपाययोजना शासनाने केल्या आहेत. मात्र, याचा काहीही फायदा ...
अमरावती/ संदीप मानकर (असायमेंट)
आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करण्यासाठी ऑनलाईन सुविधांसह अनेक उपाययोजना शासनाने केल्या आहेत. मात्र, याचा काहीही फायदा होत नसून आरटीओ कार्यालयात नागरिकांना खासगी एजंटांचा सहारा घ्यावा लागत आहे. वाहनाचे लर्निंग व पर्मनन्ट लायसन्स काढून देण्यासाठी दलाल अडीच ते चार हजारापर्यंत रक्कम घेत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेक दरम्यान समोर आला.
आरटीओत फोफावलेल्या दलालराजमध्ये एजंटाशिवाय आरटीओ कार्यालयाचे पानही हालत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून आरटीओत कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, आरटीओच्या अधिकाऱ्यांना एजंटांमध्ये रस असल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका अधिकाऱ्यांची दिसत आहे.
बॉक्स
वाहन फिटनेस सर्टिफिकेट
खासगी व परिवहन वाहनांना आरटीओच्यावतीने फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते. नियमानुसार ट्रकसाठी ८०० रुपये पडतात. मात्र, एजंटामार्फत ते तीन हजारात काढले जाते. कारसाठी ८५०, तर एजंट दोन हजार घेतात. दुचाकीसाठी ३५० रुपये पडतात. ग्राहक एजंटच्या हाती लागला तर काम करून घेण्याचे किमान हजार रुपये घेत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
पर्मनंट लायसन्स
लर्निंग दुचाकी व चारचाकी चालविण्याचे लायसन्स काढायचे असेल तर नियमानुसार ३५२ रुपये शुल्क व पर्मंनंट लायसन्सकरिता १०६६ रुपये शुल्क भरून लायसन्स काढता येते. मात्र, एजंटकडून हे काम करून घेण्याचे तीन ते चार हजार रुपये घेतले जातात.
बॉक्स
आरटीओ कार्यालयाचा भूलभुलय्या
आरटीओ कार्यालयात कुणीही कामानिमित्त गेल्यास त्यांना कम करून घेण्यास विलंब लागतो. नागरिकांना लर्निंग लायसन्स नियमाने कसे काढावे, पर्मनन्ट लायसन्स कसे काढावे, याची फारशी माहिती नसते. त्यामुळे ते संबंधित अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्यांना तासनतास बाहेर उभे ठेवले जातात. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी अनेक ग्राहक एजंटचा सहारा घेतो.
४५० एजंटचा गराडा
आरटीओत लहान - मोठे ४५० पेक्षा अधिक एजंटांचा वावर असतो. आरटीओ परिसरात त्यांचा वावर असतो. कुणीही कामासाठी गेल्यास त्यांच्याभोवती गराडा घातला जातो.
अधिकारी म्हणतात, एजंटफ्री कार्यालय!
बाहेर कोण काय करते, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. नागरिकांना थेट आरटीओच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा. त्यानंतरही नियमानुसार काम होत नसेल तर कारवाई करू.
- रामभाऊ गिते, आरटीओ, अमरावती