भूमकाबाबाने काळा उंदीर सोडल्यानंतरच मेळघाटात कूपकटाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:08 AM2018-11-30T01:08:19+5:302018-11-30T01:08:42+5:30

पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत जारिदा वनपरिक्षेत्रातील राहू व कारंज कुपातील थांबलेली लाकूड कटाई भूमकाबाबाने कुपात काळा उंदीर सोडल्यानंतरच सुरू झाली.

Without a black rumbling in the field, Kupakatai in Melghat! | भूमकाबाबाने काळा उंदीर सोडल्यानंतरच मेळघाटात कूपकटाई!

भूमकाबाबाने काळा उंदीर सोडल्यानंतरच मेळघाटात कूपकटाई!

Next

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग अंतर्गत जारिदा वनपरिक्षेत्रातील राहू व कारंज कुपातील थांबलेली लाकूड कटाई भूमकाबाबाने कुपात काळा उंदीर सोडल्यानंतरच सुरू झाली.
कारंज वर्तुळातील बिबलखेडा नियतक्षेत्रातील कूपकटाई झालेले सागवान लाकूड ट्रकमध्ये भरताना, क्रेनमधील लाकूड अंगावर पडून मनाजी जिरगा कासदेकर (३०, रा. कारंज) या रोजंदारी मजुराचा ३१ मार्च २०१८ ला मृत्यू झाला. यापूर्वी १० नोव्हेंबर २०१७ ला सागतोडीचे काम करीत असताना लाकूड अंगावर पडून मोतीलाल सावजी धिकार (४३, रा. राहू) हा मरण पावला. या दोन्ही घटनांमुळे मजुरांनी कूपकटाई थांबविली. काही तरी आहे म्हणूनच घटना घडत आहेत, अशी शंका त्यांच्या मनात घर करून गेली. वनअधिकारी व वनकर्मचारी यांच्याजवळ त्यांनी ही शंका व्यक्त केली. यावर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या भूमकाबाबाचा शोध लगतच्या पाच-दहा गावांत घेतला गेला.
चोबिदा येथील भूमकाबाबाला कारंज येथे आणण्यात आले. तेथे शगून बघितला गेला. शगूनमध्ये भुमकाबाबाने कारंजमधील कुपाला क्लीनचिट दिली. बाधा नसल्याचे स्पष्ट केले, तर राहू मधील कुपात बाधा असल्याचे सांगत पूजेचा प्रस्ताव पुढे ठेवला. पुजेकरिता दोन झेंडे, काला चूहा (काळा उंदीर), नारळ आणि डबकी भरून सिड्डू (दारू) व अन्य साहित्य भूमकाबाबाने सुचविले. त्यासाठी काळा उंदीर पकडण्यात आला. भूमकाबाबासह गावकरी राहूच्या कुपात पोहोचले. तेथे पूजा पार पडली. काळा उंदीर कुपात सोडला गेला. गोमूत्राप्रमाणे डबकीतील सिड्डू उपस्थितांच्या अंगावर व कुपात शिंपडली गेली आणि या पूजेनंतर कूपकटाई सुरू झाली. पूजेला वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांनीही हजेरी लावली आणि थांबलेली कूपकटाई सुरू झाल्याची माहिती उपवनसंरक्षकांनाही दिली गेली.

पूर्व मेळघाट वनविभागात अंधश्रद्धेला खतपाणी : प्रशासन ढासळले, खासदारांकडेही दुर्लक्ष
खासदारांची अवमानना
जारिदा वनपरिक्षेत्र अंतर्गत कारंज येथील मनाजी कासदेकर याच्या अपघाती मृत्यूची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांना तब्बल चार महिन्यानंतर देण्यात आली. २८ मे रोजी त्यांनी एका पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे माहितीवजा अहवालाची मागणी केली होती. खासदारांना अहवाल अप्राप्त असल्यावरून मुख्य वनसंरक्षकांनी नाराजी व्यक्त करून १० जुलैच्या पत्रान्वये उपवनसंरक्षकांना अवगत केले होते. खा. अडसूळ यांनी जारिदा वनपरिक्षेत्रातील वनसंरक्षण व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आणि वनअधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चेकरिता जारिदा येथे १५ नोव्हेंबरला बैठक लावली होती. परंतु, सहायक वनसंरक्षक सानप यांनी अन्य क्षेत्रीय वनअधिकारी व वनकर्मचाऱ्यांना एकताई येथे गुंतवून ठेवले होते.

सानप यांची कारकीर्द वादग्रस्त
उपवनसंरक्षक युवराज यांच्या बदलीनंतर पूर्व मेळघाट वनविभागातील प्रशसन ढासळले आहे. सहायक वनसंरक्षक सानप तेथे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीला सर्वच कंटाळले आहेत. अधिनस्थ कर्मचारी त्यांच्या, तर ते कर्मचाºयांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करित आहेत. काहींनी आपली बदली अधेमधेच करून घेतली आहे. सानप यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. पांढरकवडा येथे त्यांच्याविरूद्ध एसीबीने गुन्हे दाखल केले. पांढरकवडा न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडल्यानंतर यलतमाळ एसीबीने प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले आहे. उमरेड अंतर्गत जुनोना भागातील बिबटाच्या पिलाच्या मृत्यूच्या अनुषंगाने सानप यांना सेवापुस्तिका ताकीद वनअधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Without a black rumbling in the field, Kupakatai in Melghat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.