पावतीविना व्यवहार, काय करते ‘सहकार’

By admin | Published: January 21, 2017 12:07 AM2017-01-21T00:07:13+5:302017-01-21T00:07:13+5:30

सावकारी व्यवसायातील कुबडे ज्वेलर्समध्ये पावतीविना व्यवहार चालतात, ही बाब मनीष जाधव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट झाली.

Without a receipt, what does 'co-operation' | पावतीविना व्यवहार, काय करते ‘सहकार’

पावतीविना व्यवहार, काय करते ‘सहकार’

Next

सावकारीचा गोरखधंदा : कुबडेचा अद्याप सुगावा नाही
अमरावती : सावकारी व्यवसायातील कुबडे ज्वेलर्समध्ये पावतीविना व्यवहार चालतात, ही बाब मनीष जाधव यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्ट झाली. मात्र, हा गैरप्रकार सुरू असताना सहकार संस्था करते तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय कुबडे अद्यापही पसार असून पोलिसांना त्याचा सुगावा लागलेला नाही.
गांधी चौकातील कुबडे ज्वेलर्सने ६२० कर्जदार शेतकऱ्यांची यादी देण्यास विलंब केल्यामुळे ते शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे याप्रतिष्ठानाचे प्रोप्रायटर विजय कुबडेविरूद्ध १२ जानेवारी रोजी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटल्यानंतरही अद्याप विजय कुबडेला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.
दरम्यान सातरगाव येथील रहिवासी मनीष जाधव यांनी जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यामध्ये सावकारीचा व्यवसाय करणारे सावकार व्याजाचे पैसे घेऊनही ग्राहकांना पावती देत नसल्याचे सांगत आहेत.

स्वतंत्र चौकशी व्हावी
अमरावती : अशिक्षित व भोळेभाबडे शेतकरी सोने गहाण ठेवण्यासाठी सावकारांकडे जातात. मात्र, त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन हे सावकार त्यांची फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट मत जाधव यांनी मांडले.
कर्जमाफीच्या मुदतीनंतरही कुबडे ज्वेलर्सने कर्जदार शेतकऱ्यांकडून व्याजाचे पैसे घेतले. मात्र, या व्यवहाराची पावती त्यांना दिली नाही. असे प्रकार अनेक सावकारांकडे सुरू आहेत. याप्रकारावर जिल्हानिबंधकांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा तरूण व जागरूक शेतकरी मनीष जाधव यांनी व्यक्त केली आहे. जाधव यांना कुबडे ज्वेलर्समधून पावती देण्यात आली नाही. जिल्ह्यात असे हजारो सावकार कर्जवाटप करतात. यातून कित्येक शेतकऱ्यांची नाडवणूक होते. त्यांना न्याय देखील मिळत नाही. त्यामुळे अशा सावकारांचा हा गोरखधंदा उघड व्हायला हवा. शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोपही शेतकरी मनीष जाधव यांनी केला आहे व कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

वेगळा गुन्हा दाखल करावा
भोळ्याभाबड्या व अशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची बाब तरुण व जागरूक शेतकरी मनीष जाधव यांनी सहकार संस्थेच्या निदर्शनास आणून दिली आहे. सावकारी व्यवसायातील विनापावतीचे कनेक्शन जाधव यांनी उघड केले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणात वेगळा गुन्हा दाखल करणे अपेक्षित ठरते.

शेतकऱ्यांनी तक्रारीसाठी पुढे येणे आवश्यक
सावकारीफासात अडकलेल्या शेतकऱ्यांनी सावकारांविरुद्ध तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. मनीष जाधव या शेतकऱ्याने पहिले पाऊल टाकले असून जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनी संघटित होऊन अशा सावकारी गोरखधंद्याविरुद्ध एकजुटीने लढा उभारावा.

Web Title: Without a receipt, what does 'co-operation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.