साक्षीदाराने पीएसआयची पकडली कॉलर
By admin | Published: June 19, 2016 12:07 AM2016-06-19T00:07:55+5:302016-06-19T00:07:55+5:30
अपघात प्रकरणातील साक्षीदाराला बयाण घेण्याकरिता ठाण्यात बोलावल्यानंतर त्याने वाद करून पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली.
अमरावती : अपघात प्रकरणातील साक्षीदाराला बयाण घेण्याकरिता ठाण्यात बोलावल्यानंतर त्याने वाद करून पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. हा प्रकार शनिवारी दुपारी ३ वाजता फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात घडला असून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, दोन महिन्यांपूर्वी राजेंद्र कॉलनीत रस्ता अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या अपघाताची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यामध्ये धीरज भुयार आणि मनीष मिश्रा हे दोघे प्रत्यक्षदर्शी असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद होते. त्यानुषंगाने शनिवारी पोलिसांनी दोन्ही साक्षीदारांना बयाण घेण्याकरिता बोलाविले. शनिवारी दोघेही ठाण्यात सोबत आले होते. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, मनीष मिश्राचे बयाण नोंदविण्यास सुरुवात केली असता अपघात माझ्यासमोर घडला नसल्याचे मनीषने सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पीएसआय ठाकूर यांनी बयाण नोंदवून घेतले. मात्र, हस्ताक्षर देतेवेळी मनीषने नकार दिला. त्यामुळे त्यांनी मनीषच्या अंगठ्याचा ठसा घेण्याचे प्रयत्न केला. याच कारणावरून मनीषने ठाकूर यांच्याशी वाद करून पीएसआय ठाकूर यांची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा गोधंळ सुरू असताना ठाण्यातील डीबी स्कॉडच्या पथकाने धाव घेऊन मनीषला आवरून त्याला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती सहायक पोलीस आयुक्त रियाजुद्दीन देशमुख आणि ठाणेदार प्रमेश आत्राम यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या तक्रारीवरून पोलिसंनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, १८९ अन्वये गुन्हा नोंदवून मनीषला अटक केली. मात्र, या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)
अपघात प्रकरणात मनीष मिश्रा व धीरज भुयारला बयाण घेण्याकरिता बोलाविले होते. मात्र, बयाणावर स्वाक्षरी करण्यास मनीषने नकार दिला. त्यातच त्याने अश्लील भाषेचा प्रयोग करून कॉलरसुध्दा पकडली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला.
- जितेंद्र ठाकूर,
पोलीस उपनिरीक्षक, फे्रजरपुरा