जिल्हा परिषद खातेप्रमुखांची मंत्रालयात साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 10:51 PM2019-02-03T22:51:17+5:302019-02-03T22:52:19+5:30
पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर पीआरसी समितीसमोर घेतली जाईल. त्यामुळे मिनिमंत्रालयात प्रशासकीय कारवाईची तयारी सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर पीआरसी समितीसमोर घेतली जाईल. त्यामुळे मिनिमंत्रालयात प्रशासकीय कारवाईची तयारी सुरू झाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने येथील जिल्हा परिषदेला सन २००८-०९ व सन २०११-१२ च्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालासंदर्भात आठवा अहवाल तसेच सन २०१२-१३ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भातील शिफारशींवर शासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची पीआरसी समितीसमोर साक्ष घेतली जाणार आहे. यामध्ये शिक्षण, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पंचायत, समाजकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांसह अन्य विभागातील मुद्यांचा समावेश राहील. त्यामुळे जिल्हा परिषदेची यंत्रणा पंचायत राज समितीच्या सुनावणीमुळे कामाला लागली आहे. त्यामुळे ४ फेब्रुवारी रोजी जि.प. सीईओंसह सर्वच खातेप्रमुख मुंबई वारीवर जाणार आहेत.