पोहऱ्यात पाण्यासाठी हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:37 PM2018-03-29T21:37:56+5:302018-03-29T21:37:56+5:30
अमरावती-चांदूर रेल्वे मार्गातील पोहराबंदी या गावातील ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
अमोल कोहळे।
ऑनलाईन लोकमत
पोहराबंदी : अमरावती-चांदूर रेल्वे मार्गातील पोहराबंदी या गावातील ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गेल्या २० दिवसांपासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
साडेतीन ते चार हजार लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीचे एक बोअरवेल कनेक्शन असून, ग्रामपंचायतीवर सात लाख रुपये थकबाकी असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याने गावकरी दररोज पायपीट करून पाणी आणत आहेत. गावातील हातपंप बंद अवस्थेत आहेत. याआधी गावात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होते. पण, आता विद्युत विभागाने कनेक्शन खंडित केल्याने चक्क २० दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. विहिरीच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. या विहिरीत केरकचरा साचल्याने पाणी दूषित झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे विहिरीच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी उपाययोजना होत नसल्याने गावात साथीची लागण होण्याची शक्यता आहे. पाणी मुबलक असून ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभारामुळे २० दिवसांपासून विहिरीवरुन पाणी आणण्याकरिता नागरिकांना पायपीट सहन करावी लागत आहे. नागरिकांना उन्हात भरधाव वाहने जात असताना राज्य महामार्ग ओलांडून पाण्याची तजवीज करावी लागत आहे.
काही नागरिकांकडे पाणीपट्टी कर थकित आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे देयक भरण्यास अडचण निर्माण झाली. नागरिकांनी थकित करावा व सहकार्य करावे.
- संजय शिंदे
उपसरपंच पोहराबंदी
गावकरी सार्वजनिक विहिरीवरून पाणी आणत आहेत. त्या विहिरीत २० दिवसांपासून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. त्यामुळे पाण्यामार्फत गावात साथीची लागण होण्याची शक्यता आहे.
- हारुण शाह,
माजी ग्रामपंचायत सदस्य