पती घरी नाही सांगूनही जबरदस्ती घरात घुसला, तिने चपलेचा प्रसाद देताच काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 04:39 PM2022-04-20T16:39:30+5:302022-04-20T16:42:43+5:30
केवळ प्रसंगावधान राखल्याने त्या महिलेसोबत होणारा विपरीत प्रसंग टळला.
अमरावती : पती घरी नाही, असे सांगितल्यावरही तो तिच्या घरात शिरला. तिला जवळ ओढले. काही तरी विपरीत घडत असल्याचे लक्षात येताच ती क्षणात सावरली अन् त्याच्यामागे चप्पल घेऊन धावली. आता आपले काही खरे नाही, या भीतीपोटी तोही तेथून रफुचक्कर झाला. केवळ प्रसंगावधान राखल्याने त्या महिलेसोबत होणारा विपरीत प्रसंग टळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात १९ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी राहुल प्रकाश मोहिते (२६) व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित महिला ही घरी जेवण तयार करीत असताना आरोपी राहुल मोहिते हा तिच्या घरी आला. तिच्या पतीचे नाव घेत तो घरी आहे का, अशी विचारणा केली. त्यावर तिने ‘ते’ घरी नसल्याचे सांगितले. तरीही मोहिते तिच्या घरात शिरला. एकाने पैसे दिले का, त्याने हो म्हटले, म्हणून मी आलो, अशी बतावणी करून त्याने तिचा विनयभंग केला. मात्र, तिने प्रसंगावधान राखत त्याच्या हाताला झटका देत त्याला बाजूला सारले. घरातील चप्पल घेऊन ती त्याला मारण्यास गेली असता तो पळून गेला.
दरम्यान, एका शेजाऱ्याने तिच्या पतीला ती माहिती दिल्याने तोदेखील घरी पोहोचला. ती आपबीती कथन करीत असतानाच आरोपीशी संबंधित असलेल्या चार महिला तिच्या घरी आल्या. तिच्याशी वाद केला. त्यात तिच्या दोन्ही हातांना मार लागला. चारही महिलांनी महिलेच्या पतीसोबतही वाद घातला. त्यामुळे महिलेने तातडीने नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी १९ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास गुन्ह्याची नोंद केली.