तू करणी करतेस.., चेटकीण म्हणून हिणवले; तिने त्रस्त होऊन जीवनच संपविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 03:17 PM2022-04-02T15:17:14+5:302022-04-02T15:47:16+5:30
मृत जयश्री व आरोप असलेल्या महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. त्या सोबतच शेतमजुरीला जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जयश्रीला हिणवणे सुरू केले होते. तू चांगली बाई नाहीस. तू आमच्यासोबत कामाला येऊ नकोस,’ असे तिला बजावले होते.
अमरावती : ‘तू करणी करतेस, चेटकीण आहेस,’ असे हिणवल्याने एका ४४ वर्षीय महिलेने आत्मघात करून घेतला. गावातीलच काही महिलांकडून होणारी ती सामाजिक बदनामी सहनशक्तीपलीकडे गेल्याने तिने २५ मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी मृताच्या पतीने तक्रार नोंदविली. वलगाव पोलिसांनी १ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता तपासाअंती संबंधित गावातीलच चार महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. जयश्री (वय ४४) असे मृत महिला मजुराचे नाव आहे.
तक्रारीनुसार, मृत जयश्री व आरोप असलेल्या महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. त्या सोबतच शेतमजुरीला जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जयश्रीला हिणवणे सुरू केले होते. ‘तू करणाकटी आहेस, तू दुसऱ्यास करणी करून रोग व बिमारी लावते. तू चांगली बाई नाहीस. तू आमच्यासोबत कामाला येऊ नकोस,’ असे तिला बजावले.
‘तुझ्यामुळे आमच्या व आमच्या मुलाबाळास धोका आहे,’ असे त्या वारंवार म्हणू लागल्या. त्या महिला असे आरोप सार्वजनिकरीत्या बोलून दाखवत असल्याने जयश्री कोल्हे यांची गावात बदनामी झाली. त्या मानसिक छळाने पुरत्या खचल्या अन् त्यांनी २५ मार्च रोजी दुपारी घरी कुणीही नसताना घरामागील खोलीत जाऊन छताखाली असलेल्या लाकडी कडेला गळफास घेतला. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले, तर वलगाव पोलिसांनी २६ मार्च रोजी आकस्मिक मृत्यूची नोेंद केली.
असा आहे आरोप
गावातील चार महिलांनी करणाकटी म्हणून हिणवल्याने आपल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा मानसिक छळ केला. त्यांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मृताच्या पतीने तक्रारीतून केला आहे. पुढील तपास वलगाव ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान भुयारकर हे करीत आहेत.
गावातील मृताचे शेजारी व काही साक्षीदारांचे बयाण नोंदविले. मृताच्या पतीनेेही बयाणातून आरोप केले, त्यामुळे सखोल तपासाअंती चार महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदविला.
- विजयकुमार वाकसे, ठाणेदार, वलगाव