कुटुंबासाठी महिला जातपंचायतीला भिडली; बहिष्कार टाकणाऱ्यांविरोधात गाठले पोलिस ठाणे
By प्रदीप भाकरे | Updated: January 11, 2025 06:22 IST2025-01-11T06:21:17+5:302025-01-11T06:22:46+5:30
१० जणांवर गुन्हा

कुटुंबासाठी महिला जातपंचायतीला भिडली; बहिष्कार टाकणाऱ्यांविरोधात गाठले पोलिस ठाणे
प्रदीप भाकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : जातपंचायतीने पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकत, कोणत्याही व्यक्तीने या कुटुंबाशी संवाद साधल्यास त्यांनाही समाजाबाहेर काढण्याचा आदेश दिला. हा अन्याय सहन न करता, थेट जातपंचायतीशी भिडत कुटुंबातील महिलेने पोलिस ठाणे गाठले. तिच्या या धाडसी कृतीमुळे जातपंचायतीतील दहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, महिलेच्या तक्रारीवरून जातपंचायतीतील दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ५, ७ अन्वये गुन्हा दाखल झाला. १४ ऑगस्ट २०२४ रोजी जातपंचायतीने निर्णय दिल्यापासून हे कुटुंब सामाजिक बहिष्काराचा अन्याय झेलत होते.
नेमके प्रकरण काय?
फिर्यादी महिलेकडे अन्य एक महिला आली. मी तुझ्या पतीपासून गर्भवती आहे, मला त्याच्याशी लग्न करायचे, असे ती म्हणाली. तिने पतीवर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला. यावर आपले लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. तिने लग्न केले नाही, असे पती म्हणाला.
अन्य महिलेने जातपंचायत कार्यालयात फिर्यादी महिलेच्या पतीविरुद्ध तक्रार केली. त्यावर पंचायतने फिर्यादी महिला व तिच्या पतीला बोलावून घेतले व तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा आदेश दिला. त्याला पतीने नकार दिल्याने जातपंचायतमधील दहा जणांनी कुटुंबाला समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला. समाजातील जी व्यक्ती या कुटुंबाशी बोलेल त्यांनाही समाजाबाहेर काढून टाकले जाईल, असा आदेश दिला.
यांच्यावर गुन्हा दाखल
संशयित आरोपींमध्ये दीपक पांडुरंग पवार, सुधाकर पवार, देवेंद्र सूर्यवंशी, धनराज पवार, शैलेश पवार, मनीष सूर्यवंशी (सर्व रा. विलासनगर, अमरावती) यांच्यासह किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार, खेमराज सोळुंके (तिघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा) व देवा पवार (रा. तिवसा) यांचा समावेश.