लॅपटाॅपची निकड सांगून बोलावले; गुंगीचे औषध देऊन सर्वस्व लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 04:30 PM2022-06-13T16:30:15+5:302022-06-13T16:53:55+5:30
त्याने तिच्यावर जबरी अतिप्रसंग केला. कुणालाही सांगू नकोस, वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.
अमरावती : लॅपटॉपची निकड सांगून तिला अपार्टमेंटमध्ये बोलावण्यात आले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर शारीरिक बळजबरी करण्यात आली. त्यानंतरही त्याने वारंवार बदनामीची धमकी देत तिचे सर्वस्व लुटले. मात्र, नकार दिल्यानंतर त्याने शरीरसंबंधासाठी ये, अन्यथा कुठेच तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही, अशी गर्भित धमकी दिली. त्या अनन्वित छळाला कंटाळून तिने रविवारी अखेर बडनेरा पोलीस ठाणे गाठले.
तक्रारीनुसार, फिर्यादी तरुणीने सन २०१६ मध्ये येथील एका महाविद्यालयात बी.एस्सी. कॉम्प्युटरकरिता प्रवेश घेतला होता. दरम्यान, सन २०१८ मध्ये कंपनीच्या एका मुलाखतीकरिता ती विद्याभारती कॉलेजमध्ये गेली असता, तेथे आरोपी शुभम मुरलीधर बोंडे (२७, रा. कमल प्लाझा, दस्तुरनगर, अमरावती) याच्याशी तिची ओळख झाली. दोघांमध्ये टेलिफोनिक संवाद सुरू झाला. शिक्षणासाठी काही मदत लागली तर सांग, करेन, अशी बतावणी आरोपीने तरुणीकडे केली.
दरम्यान, ६ जानेवारी २०१९ रोजी तुझ्या लॅपटॉपची आवश्यकता आहे, असा कॉल शुभमने तिला केला. लॅपटॉप घेऊन त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अकोली ते खंडेलवाल रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये तिला बोलावले. तेथे तिला शीतपेय देण्यात आले. ते प्राशन करताच तिला गुंगी आली. त्याने तिच्यावर जबरी अतिप्रसंग केला. कुणालाही सांगू नकोस, वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेल, अशी धमकी त्याने तिला शुद्ध आल्यानंतर दिली.
पुन्हा बलात्कार
१९ मार्च २०२२ रोजी रात्री १०.३० वाजता शुभमने पुन्हा तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवले. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला फोन केला. माझ्यासोबत शारीरिक संबंध कर, नाहीतर तुझी बदनामी करतो, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तिने १२ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बडनेरा पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले. आरोपी शुभम बोंडेविरुद्ध कलम ३७६ (२), एन, ३२८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.