बनावट आधार, बनावट पॅन अन् महिलाही तोतया; गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: January 9, 2023 04:31 PM2023-01-09T16:31:55+5:302023-01-09T16:36:51+5:30
खरेदी विक्री व्यवहार : १०.६० लाख रुपयांनी फसवणूक
अमरावती : बनावट आधार कार्ड व बनावट पॅन कार्ड दाखल करून खरेदी विक्री व्यवहारावेळी तोतया महिला उभी करून एका महिलेची १०.६० लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक एस. जी. पावडे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी अविनाश श्रीधर काळे (४९) व एक महिला अशा दोघांविरुद्ध ८ जानेवारी रोजी पहाटे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ७ ते २७ डिसेंबर २०२२ दरम्यान ती फसवणुकीची घटना घडली.
दोन जणांनी बनावट ओळखपत्राच्या आधारे दस्त नोंदणी केल्याच्या अनुषंगाने संबंधितावर नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, तशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात यावी, असे पत्र सह दुय्यम निबंधक पावडे यांना २७ डिसेंबर २०२२ रोजी पत्र प्राप्त झाले. त्यानुसार, त्यांने ८ जानेवारी रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, एका महिलेने सन १९८६ मध्ये रहाटगाव शिवारात २४०० चौरसफुट प्लॉट विकत घेतला होता. त्या प्लॉटची ७ डिसेंबर रोजी परस्परच विक्री करण्यात आली. तशी दस्तनोंदणीदेखील करण्यात आली.
अलिकडे त्या मुळ मालक महिलेला आपला प्लॉट कुणीतरी विकला, आपल्या नावावर अन्य एका महिलेला उभे करण्यात आल्याची बाब समजली. चौकशीअंती आरोपी अविनाश श्रीधर काळे (४९, जवाहर वार्ड ३ चिखलदरा) याने मुळ मालक महिलेला जागी एक अनोळखी महिला उभी करुन त्या प्लॉटची १० लाख ६० हजार रुपयांमध्ये एका महिलेला खरेदी करून दिली.
खोटे दस्तावेज खरे भासविले
अविनाश काळे व महिला आरोपीने मुळ मालक असलेल्या महिलेचे खोटे आधार कार्ड व खोटे पॅन कार्ड देखील बनविले. मात्र दस्तनोंदणीवेळी ते सर्व दस्तावेज खरे असल्याचे भासवुन प्लॉटची विक्री केली. सह दुय्यम निबंधक कार्यालयाने त्याबाबत स्वतंत्र चौकशी केली. संपुर्ण खातरजमा झाल्यानंतर पावडे यांनी तक्रार नोंदविली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणूक, फौजदारी स्वरूपाचा कट रचणे व नोंदणी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.