विवाहितेला ‘दुसरी’चा मेसेज, ‘तुझा पती माझ्याशी लग्न करणार!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 05:00 PM2022-02-07T17:00:47+5:302022-02-07T17:12:52+5:30
पीडित महिलेचे सुमित कारेमोरेशी लग्न झाले. पण लग्नानंतर लगेचच हुंडा दिला नाही, दागिने दिले नाही, म्हणून माहेराहून १० तोळे सोने आणण्याचा तगादा लावण्यात आला. सोने न आणता परतलीस तर घरातून हाकलून देऊ, अशा धमक्या पती व सासरकडून तिला देण्यात आल्या.
अमरावती : वर्षभरापूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या विवाहितेला माहेरून तब्बल १० तोळे सोने आणण्याचा तगादा लाऊन तिचा अनन्वित छळ करण्यात आला. छळाची ती मालिका तेवढ्यावरच न थांबता पतीच्या कथित प्रेयसीने तिला तुझा पती घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करणार आहे, असे फेसबुक संदेश टाकले. त्यामुळे हादरलेल्या त्या विवाहितेने शहर कोतवाली गाठून तक्रार नोंदविली.
विवाहितेने त्यासंदर्भात भंडारा शहरात पती, सासरा व एका महिलेविरुद्ध तक्रार नोंदवून घेतली; मात्र महिला अमरावतीची माहेरवासिनी असल्याने ते प्रकरण अमरावती आयुक्तालयातील महिला सहायक कक्षाकडे वर्ग करण्यात आले होते. पुढील कारवाईसाठी ६ फेब्रुवारी रोजी शहर कोतवाली ठाण्यात पाठविण्यात आले. शहर कोतवाली पोलिसांनी सुमित कारेमोरे (३१), प्रभाकर कारेमोरे (६६, दोघे रा. भंडारा) व एका महिलेविरुद्ध रविवारी दुपारी १.३४ वाजता गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रारकर्ती महिलेचे सुमित कारेमोरेशी लग्न झाले. ती भंडारा येथे सासरी गेली. पण लगेचच लग्नात हुंडा दिला नाही, दागिने दिले नाही, म्हणून माहेराहून १० तोळे सोने आणण्याचा तगादा लावण्यात आला. सोने न आणता परतलीस तर घरातून हाकलून देऊ, अशा धमक्या पती व सासरकडून तिला देण्यात आल्या.
पतीचे विवाहबाह्य संबंध
पती सुमितसोबत आपले विवाहबाह्य संबंध असल्याबाबत एका महिलेने फिर्यादी महिलेला संदेश टाकले. तिचे फेसबुक खाते ओपन करून त्यावर देखील त्या ‘त्रयस्थ’ महिलेने तिचे व सुमितच्या विवाहबाह्य संबंधांचा दाखला देत, तुझा पती लवकरच तुझ्याशी घटस्फोट घेऊन माझ्याशी लग्न करणार आहे, असे संदेश देखील ती पाठवित असल्याचे महिलेने म्हटले आहे.
बायोडेटातील शेती, शिक्षणही खोटे
लग्नापूर्वी दिलेल्या बायोडेटामध्ये सुमित कारेमोरे हा नागपूर विद्यापीठाचा यांत्रिकी अभियंता असल्याचे सांगण्यात आले. शेती देखील २२ एकर व वडील निवृत्त अभियंता असल्याचे सांगण्यात आले. वय देखील खोटे सांगण्यात आल्याचे त्या विवाहितेला सासरी गेल्यानंतर कळले. तिची दिशाभूल करून देखील तुला लग्न करून आणलेच, आम्ही जिंकलो. तुला काय फायदा झाला? , आता जे होईल ते करून घे, अशी दर्पोक्ती देखील करण्यात आली. प्रकरणाचा तपास शहर कोतवालीतील सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर करीत आहेत.