बळजबरी, साक्षगंध, लग्नास नकार अन् ब्लेडने वार! अमरावतीतील खळबळजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 03:34 PM2022-03-03T15:34:36+5:302022-03-03T15:46:59+5:30

आपण लग्न करणारच आहोत, केवळ बहिणीचे तेवढे होऊ दे, अशी बतावणी करून त्याने वारंवार पीडितेशी बळजबरी केली.

woman filed a complaint against lover for fraud and harassment by showing lure of marriage | बळजबरी, साक्षगंध, लग्नास नकार अन् ब्लेडने वार! अमरावतीतील खळबळजनक घटना

बळजबरी, साक्षगंध, लग्नास नकार अन् ब्लेडने वार! अमरावतीतील खळबळजनक घटना

Next
ठळक मुद्देपाच लाखांसाठी तोडले लग्नउच्चशिक्षित तरुणी पोहोचली ठाण्यात

अमरावती : एका स्नेहसंमेलनात सन २०१४ मध्ये झालेली ओळख, बहरलेले प्रेम, लग्न करणारच आहोत, अशी बतावणी करून वारंवार केलेली बळजबरी, साक्षगंध व त्यानंतर लग्नास नकार देऊन पाच लाखांसाठी मोडलेले लग्न. त्यानंतरही माझ्यासाठी काय करू शकतेस, अशी दर्पोक्ती आणि ‘मरून दाखव’ असे आव्हान दिल्याने एका उपवर तरुणीने स्वत:च्या हातावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना येथे उघड झाली.

याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दि. १ मार्च रोजी अजय प्रल्हाद तंतरपाळे (वय ३४, रा. दिलदारपुरा, अचलपूर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाने नखशिखांत हादरलेल्या २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने मंगळवारी पोलीस ठाणे गाठले होते.

तक्रारीनुसार, पीडिता ही उच्चशिक्षणासाठी अमरावती येथे भाडेतत्त्वावर रूम घेऊन राहते. सन २०१४ मध्ये पंचवटी भागात राहत असताना एका वकील मैत्रिणीच्या माध्यमातून ती डिसेंबर २०१४ मध्ये एका स्नेहसंमेलनात सहभागी झाली. तेथे तिची अजय तंतरपाळे याच्याशी ओळख झाली. मोबाइल संवाद सुरू झाला. तिलाही तो आवडू लागल्याने तिने त्याचे प्रेम व लग्नाचे प्रपोजल मान्य केले. प्रेमाच्या आणाभाका घेऊन दोघांमध्ये नियमित भेटी होऊ लागल्या. त्यानंतर लवकरच त्याने तिची भाड्याची खोली गाठून तिच्यावर बळजबरी केली. पुढे आपण लग्न करणारच आहोत, केवळ बहिणीचे तेवढे होऊ दे, अशी बतावणी करून त्याने वारंवार बळजबरी केली.

रीतसर पाहणी, साक्षगंधही

अजयबाबत तरुणीने आपल्या आई-वडिलांना सांगितले. त्यावर लग्नाच्या बोलणीकरिता आई-वडिलांना घेऊन ये, असे त्याला कळविण्यात आले. तत्पूर्वी अजयच्या बहिणीच्या लग्नासाठी तरुणीच्या आई-वडिलांनी त्याला एक लाख रुपये उधारदेखील दिले. १९ एप्रिल २०२१ रोजी रीतसर पाहणी झाली, तर २३ मे रोजी तिचे अजय तंतरपाळेसोबत साक्षगंध देखील झाले. त्यावेळी फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न समारंभ करण्याचेदेखील निश्चित झाले. साक्षगंधानंतरदेखील अजय तिला अनेक ठिकाणी घेऊन गेला. तिच्याशी शारीरिक संबंधदेखील ठेवले.

त्याच्या आईवडिलांनी मागितले पाच लाख

तत्पूर्वी, लग्न चांगले झाले पाहिजे, असा दम त्याने भरला होता. त्यामुळे पैसे आल्यानंतर तिने अजयला लग्नाची तारीख काढण्यासाठी तगादा लावला. यादरम्यान १५ फेब्रुवारी रोजी अजय हा त्याच्या आई-वडील, भाऊ व नातेवाईकांना घेऊन तरुणीच्या घरी आला. अचानकच अजयची बहीण व जावई देखील आले. अजयला बाजूला घेऊन पाच लाख रुपये देत असतील, तरच लग्नाची तारीख काढ, असा सल्ला बहिणीने दिला. ते सर्व जण घराबाहेर पडले. ही मुलगी घरात आल्यास मी घरात राहणार नाही, असे अजयच्या वडिलांनी बजावले.

अन् तिला केले प्रवृत्त

बाहेरचे तमाशे बंद कर, असे बजावून तरुणी घरात शिरली. पाठोपाठ अजय देखील शिरला. आई-वडील नाही म्हणतात म्हणून त्याने लग्नाला नकार दिला. मात्र, त्याचवेळी माझ्यासाठी काय करू शकते, असे तो म्हणाला. त्यावर तुझ्यासाठी मरू शकते, अशी ती उत्तरली. मरून दाखव म्हणताच तिने ब्लेडने डाव्या हातावर वार केले. अजयनेच तिला दवाखान्यात नेले. त्यानंतरही अजयच्या नातेवाईकांनी तिच्या घरासमोर धिंगाणा घातला.

Web Title: woman filed a complaint against lover for fraud and harassment by showing lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.