पालकांना ‘आय एम सॉरी’चा मॅसेज अन् फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरीलाच ‘ती’ झुलली फासावर
By प्रदीप भाकरे | Published: November 23, 2022 01:38 PM2022-11-23T13:38:41+5:302022-11-23T13:42:24+5:30
गणेशननगर येथे नवविवाहितेची आत्महत्या
अमरावती : तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असल्याने अगदी पुर्वसंध्येपासूनच तिच्या मोबाईलवर ‘हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरीचे मॅसेज धडकू लागले. ती मनोमन आनंदली. पती, पत्नी दोघेही चिखलदऱ्याला गेले. तेथे तिने पतीला एक दिवस आणखी थांबू, असे म्हटले. मात्र पतीने भांडण करून तिला सायंकाळी घरी परत आणले. त्यानंतर काहीच वेळात तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ नोव्हेंबरची फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी तिच्या आत्महत्येने ‘डेथ ॲनिव्हर्सरी’मध्ये बदलली. मृत्यूपूर्वी तिने वडिलांना ‘आय एम सॉरी’ असा मॅसेज देखील टाकला.
स्नेहल गोविंद सावध (रा. गणेशनगर, देशमुख लॉन परिसर, अमरावती) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी मृताचा पती गोविंद प्रकाशराव सावध, दिर आशिष प्रकाशराव सावध व एका महिलेविरुद्ध कौटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, स्नेहल व गोविंद यांचा २१ नोव्हेंबर २०२१ ला विवाह झाला होता. त्यानंतर गोविंद व त्याच्या कुटुंबातील सदस्य तिला त्रास देत होते. माहेराहून १ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून तिचा अनन्वित मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस असल्यामुळे स्नेहल व गोविंद दोघेही चिखलदरा गेले. आणखी एक दिवस चिखलदरा थांबू, असे मुलीने पती गोविंदला म्हटले. मात्र त्याने वाद घालून स्नेहलला अमरावतीत परत आणले. दरम्यान सोमवारी सायंकाळी ७.३० ते ७.४५ दरम्यान स्नेहलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
असा आहे आरोप
तक्रारीनुसार, पती व सासरच्या मंडळींनी १ लाख रुपयांची मागणी करून स्नेहलचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. त्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृतक मुलीच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान आत्महत्येपुर्वी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या स्नेहलने वडिलांना ‘खूप मानसिक त्रास होत आहे पप्पा येथे सर्वांना, आय ॲम सॉरी’ असा मेसेज केला होता. मात्र कामात असल्याने तिचे वडिल तो मॅसेज पाहू शकले नाहीत. त्यांनी तो मॅसेज उशिराने वाचला. तोपर्यंत ती फासावर झुलली होती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला.