लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोनवेळा गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:57 AM2021-11-01T10:57:28+5:302021-11-01T11:10:52+5:30
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर दोन वेळा गर्भपातदेखील करण्यात आला. पुढे लग्नास नकार देत मारहाण करुन तिला वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले आहे.
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तरुणीवर अत्याचार केला. त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर दोन वेळा गर्भपातदेखील करायला लावला. गर्भपातानंतर पुन्हा मारहाण करून अत्याचार करून लग्नास नकार देत तिला वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
३० ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना उघड झाली असून या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये पीडितेची राहील मकसूद जादा ( वय १९, पॅराडाइज कॉलनी) याच्यासोबत ओळख झाली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. डिसेंबर २०२० मध्ये पीडित स्पर्धा परीक्षेच्या शिकवणीसाठी अमरावतीत आली. ती येथे भाड्याने राहत होती. यावेळी राहील तिच्या खोलीवर आला. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. विश्वास संपादन केल्यानंतर राहीलने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर पीडिता खोली सोडून राहत्या गावी निघून गेली.
यावेळी राहीलने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला पुन्हा अमरावतीत बोलाविले. त्याने पीडितेला खोली करून दिली. त्यानंतर त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले. त्यातून पीडितेला गर्भधारणा झाली. ही बाब तिने राहीलला सांगितली. त्यावर राहीलने सध्या लग्न करू शकत नाही, असे म्हणून तिचा गर्भपात केला. त्यानंतरही राहीलने तिला वारंवार कॉल करून लग्नाचे आमिष दाखविले. त्याने पीडितेच्या गावी जाऊन गोंधळ घातला. त्यानंतरही राहीलने लग्नाचे आमिष व धमकी दिल्याने पीडिता पुन्हा अमरावतीत आली. यावेळी राहीलने भाड्याने खोली करून पीडितेवर वारंवार अत्याचार केला. त्यामुळे पीडितेला पुन्हा गर्भधारणा झाली. याबाबत तिने राहीलला माहिती दिली. त्यावर राहीलने तिला टाळाटाळ करून गर्भपात करण्यास सांगितले.
घरातून हाकलले, मारहाणदेखील
पीडितेने राहीलच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या प्रतापाची माहिती दिली. लग्नाबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून हाकलून दिल्याचे पीडितेने म्हटले आहे. पीडिता पुन्हा राहीलच्या घरी गेली. यावेळीही तिला धमकी देऊन हाकलून लावण्यात आले. त्यामुळे पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहीलसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.