लग्नाचे आमिष देऊन महिलेवर शेगाव, अमरावतीत अत्याचार
By प्रदीप भाकरे | Published: April 4, 2023 05:22 PM2023-04-04T17:22:17+5:302023-04-04T17:22:55+5:30
लग्नास नकार, बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
अमरावती : लग्नाचे आमिष देऊन एका महिलेवर प्रथम शेगाव व त्यानंतर अमरावतीत वारंवार अत्याचार करण्यात आला. मात्र त्यानंतर त्याने ‘तो मी नव्हेच’ चा पवित्रा घेत लग्नास नकार दिला. १८ डिसेंबर २०२२ ते ४ मार्चदरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी ३ एप्रिल रोजी रात्री आरोपी लोकेश रामकृष्ण रताळे (३३, रा. द्वारकानगर, अमरावती) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, एका ३२ वर्षीय महिलेचे सन २०१७ मध्ये लग्न झाले. मात्र, पतीचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे कळल्यावर तिेने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण दाखल केले. दरम्यानच्या काळात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असलेला लोकेश हा पुन्हा त्या महिलेच्या जीवनात आला. त्याने तिला आपण लग्नासाठी तयार असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला.
१८ डिसेंबर २०२२ रोजी लोकेशने महिलेच्या मोबाइलवर कॉल करून आपण शेगाव येथे देवदर्शनासाठी जाऊया, असे म्हटले. त्यास महिलेने होकार दिल्यावर दोघेही शेगावला गेले. तेथील एका लॉजवर लोकेशने त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. त्यानंतर लोकेशने त्याच्या घरी कुणी नसताना पीडित महिलेला अनेकदा बोलावून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिताने लोकेशकडे लग्नाची मागणी केली. त्यावर लोकेशने टाळाटाळ चालविली. लोकेशन लग्न करणार नसल्याचे लक्षात आल्यावर पीडित महिलेने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लोकेशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.