केस मागे घेण्यासाठी न्यायालयात समझोता; पुन्हा केली बळजबरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 12:12 PM2022-02-01T12:12:11+5:302022-02-01T12:20:22+5:30
लग्न करण्याच्या अटीवर पीडिताने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून परत घेतले. त्यानेदेखील त्यावेळी लग्न करण्याची बतावणी करून केस मागे घेण्याची विनवणी केली.
अमरावती : बलात्काराचा दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी लग्नाची बतावणी करून न्यायालयीन प्रकरण मागे घेतल्यानंतरदेखील पुन्हा शारीरिक बळजबरी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. तिला जातिवाचक शिवीगाळदेखील करण्यात आली.
याप्रकरणी खल्लार पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी मंगेश प्रदीप पारशिवकर (३३) व एक महिला (दोघेही रा. खल्लार) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ५०४, ५०६ व ॲट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी मंगेशची सन २०१२ मध्ये ओळख झाली. ते २०१३ ते २०१५ या कालावधीत फोनवरून संपर्कात होते. सन २०१५ मध्ये ती आरोपीच्या संगणक केंद्रात काम करू लागली. त्यावेळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. त्यानंतरही तो लग्नाला टाळाटाळ करत असल्याचे दिसताच पीडिताने त्याच्याविरुद्ध अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून त्याच्याविरूद्ध बलात्कार व ॲट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी बॅकफूटवर आला. लग्न करण्याच्या अटीवर पीडिताने ते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून परत घेतले. त्यानेदेखील त्यावेळी लग्न करण्याची बतावणी करून केस मागे घेण्याची विनवणी केली.
पुन्हा टाळाटाळ, पुन्हा बलात्कार
केस मागे घेतल्यानंतर पीडिताने आरोपी मंगेश पारशिवकर याला लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. मात्र, त्याने तिची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत नकारघंटा कायम ठेवली. २५ जानेवारी रोजी लग्न करायचे आहे म्हणून आरोपी तिला घरी घेऊन गेला. तेथेदेखील लग्नाचे आमिष देत त्याने तिचे सर्वस्व लुटले. ३० जानेवारी रोजी पीडिता ही तिच्या मामासोबत त्याच्या घराजवळ गेली असता, एका महिलेने तिला जातिवाचक शिवीगाळ केली तथा जिवे मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून तिने ३१ जानेवारी रोजी दुपारी खल्लार पोलीस ठाणे गाठले.
२८ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविण्यात आले आहे.
विनायक तांबे, ठाणेदार, खल्लार