महिलेच्या अंगावर पानाची पिचकारी
By admin | Published: July 11, 2017 12:07 AM2017-07-11T00:07:30+5:302017-07-11T00:07:30+5:30
बांधकाम विभाग कार्यालयासमोरून जाणाऱ्या परिचर महिलेच्या अंगावर पानाची पिचकारी फेकणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य रविंद्र मुंदेविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला.
झेडपीतील घटना : जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदेविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बांधकाम विभाग कार्यालयासमोरून जाणाऱ्या परिचर महिलेच्या अंगावर पानाची पिचकारी फेकणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य रविंद्र मुंदेविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदविला. ही घटना जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ७ जुलै रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली होती. यागंभीर प्रकाराबाबत सोमवारी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.
आरोग्य विभागातील परिचर मंदा साबळकर दुपारी १२.३० वाजता त्यांच्या विभागातील शासकीय दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रती काढून बांधकाम विभागासमोरून जात होत्या. त्याच दरम्यान एका शासकीय कंत्राटदाराने तोंडातील पानाची पिचकारी दारातूनच बाहेर फेकली. नेमकी ती परिचर मंदा साबळकर यांच्या अंगावर पडली. यागंभीर प्रकाराची विचारणा साबळकर यांनी बांधकाम विभागात उपस्थित असणाऱ्यांकडे केली असता कोणीही बोलायला तयार नव्हते. उलट त्यांनी साबळकर यांची खिल्ली उडविली. असे प्रकार चालतच असतात, असे उद्धट उत्तर त्यांना दिले. या घाणेरड्या प्रकाराबद्दल साबळकर यांनी आरोग्य व वित्त सभापतींकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित कंत्राटदाराला बोलविले. मात्र, तो हजर झाला नाही. शासकीय विभागात गुटखा व पान खाऊन थुंकणे गुन्हा आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मंदा साबळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. परवानगी मिळाल्यानंतर सोमवारी त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार गाडगेनगर पोलिसांनी रविंद्र मुंदेविरुध्द भादंविच्या कलम ५०९ व मुंबई पोलीस कायदा ११५ व ११७ अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी दिली.
जि.प. कर्मचारी युनियनचा पुढाकार
महिला परिचरासोबत घडलेल्या यागंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेतली. तक्रार नोंदविण्याची परवानगी मिळताच त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास पुढाकार घेतला. अशा असभ्य वागणुकीबद्दल संबंधित दोषीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी युनियनने केली.