बनावट प्रमाणपत्राद्वापे शासकीय योजनेचा लाभ घेत होती महिला, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 03:50 PM2021-11-26T15:50:07+5:302021-11-26T16:35:25+5:30
महिलेने अपंग असल्याचे बनावट प्रमाणपत्र संजय गांधी विभागात दाखल करून सन २०१४ पासून लाभ घेत असल्याचा पुरावा आरटीई कार्यकर्त्याने कागदपत्रासह तक्रारी सोबत दाखल केला होता.
अमरावती : स्थानिक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात प्रचंड घोळ असल्याची तक्रार एका आरटीई कार्यकर्त्याने तहसीलदारांकडे केली होती. याप्रकरणी तहसीलदारांनी चौकशी केली असता, तथ्य आढळून आले. सदर महिलेवर शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिराजगाव कसबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेत सरिता नरेंद्र तिखिले (३८, सिरजगाव कसबा) यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाच्या योजनेचा लाभ घेणे सुरू होते. याप्रकरणी एका आरटीई कार्यकर्त्याने सदर लाभार्थ्याच्या चौकशीची मागणी केली होती. सिरजगाव कसबा येथील सरिता नरेंद्र तिखिले या महिलेने डोळ्याने अंध असल्याचे बनावट प्रमाणपत्र संजय गांधी विभागात दाखल करून सन २०१४ पासून लाभ घेत असल्याचा पुरावा आरटीई कार्यकर्त्याने कागदपत्रासह तक्रारी सोबत दाखल केला होता.
महसूल विभागातील संजय गांधी विभागांतर्गत येणाऱ्या अपंग निराधार योजनेच्या माध्यमातून सारिता नरेंद्र तिखिले यांनी दोन्ही डोळे ४० टक्के अंधत्व असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र मूळ प्रमाणपत्र १० टक्क्याचे असल्याचे निष्पन्न झाले. ४० टक्के अंधत्व असल्याचे कोणतेही प्रमाणपत्र सरिता तिखीले यांना देण्यात आले नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले.
यावर सदर महिलेने बनावट प्रमाणपत्रावर लाभ घेऊन शासनाची ५९४०० रुपयांची फसवणूक केल्याचे सिध्द झाले. या प्रकरणाची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. संजय गांधी निराधार विभागाचे नायब तहसीलदार पंकज चव्हाण यांनी पोलिसात तशी तक्रार केली. यावर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांच्या मार्गदर्शनात सरिता तिखिले यांच्यावर भादंविचे कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सन २०१५ पासून बनावट प्रमाणपत्रावर लाभ घेतल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्या कडून ५९,४०० रुपये वसूल करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
सदर महिलेने अपंगाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून संजय गांधी निराधार योजनेचा ५९४०० रुपयांचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांत तक्रार केली व लाभ घेतलेल्या रकमेची वसुली करण्याचे पत्र दिले.
- धीरज स्थुल, तहसीलदार