मांत्रिकाच्या घरी बाळंतिणीचा मृत्यू; बाळही दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 01:12 PM2020-07-27T13:12:12+5:302020-07-27T13:13:52+5:30
आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आरोग्य सेवा नाकारून मांत्रिकाकडून उपचार घेणाऱ्या एका प्रसूताचा तेथेच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जुटपाणी नामक गावात घडली. रविवारी पहाटे ही घटना उघड झाली. सुखमणी रामचंद्र कासदेकर (२६, झापल) असे मृताचे नाव आहे. यापूर्वी ११ जुलै रोजी तिच्या नवजाताचादेखील मृत्यू झाला.
झापल येथील सुखमणीची ११ जुलै रोजी जुटपानी येथील भुमका परिहारच्या घरी प्रसूती झाली. तिने कमी वजनाच्या बाळाला जन्म दिला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने तिला व तिच्या बाळाला उपचाराकरिता ११ जुलै रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे सहा तासांतच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. तिला दोन दिवसांनी सुटी देण्यात आली. त्यानंतर २५ जुलै रोजी प्रसूताला पुन्हा उपचाराकरिता आणण्यात आले. मात्र, तिने मध्यरात्री धारणी रुग्णालयातून पळ काढला. ती पुन्हा भूमका परिहारकडे पोहोचली.
आरोग्य विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले तेव्हा तिच्या घरी भूमका परिहार यांच्याकड़ून तिच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान आरोग्य यंत्रणेने तिला व तिच्या नातेवाइकांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात येण्याची विनवणी केली. नातेवाईकांनी स्पष्ट नकार देत भूमका परिहार यांचा उपचार होत नाही, तोपर्यंत आम्ही रुग्णालयात येणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. २५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजतादरम्यान भूमका परिहारचा उपचार संपल्यानंतर आरोग्य विभागाने त्या प्रसूताला सायंकाळी ७ वाजता पुन्हा उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे उपचाराकरिता भरती दाखल करण्यात आले. प्रकृती खालावत चालल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला अमरावती येथे हलविण्याची सूचना केली. परंतु, तिच्या नातेवाइकांनी व तिने अमरावती येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला. शनिवारी रात्री तेथून पळ काढून भूमका परिहारचे घर गाठले व तेथे उपचार केला. तेथेच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर २६ जुलै रोजी सकाळी सहा वाजता तिचा मृतदेह घेऊन नातेवाईक झापल गावात पोहोचले.
सदर मातेला आम्ही उपचारानंतर अमरावती येथे हलविण्याचे ठरविले. परंतु, तिने उपचार घेण्यास व अमरावतीला जाण्यास नकार दिला. शनिवारी मध्यरात्री रुग्णालयातून पळ काढला. त्याबाबत पोलिसांनासुद्धा माहिती देण्यात आली.
- अमोल नालट, वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय, धारणी
प्रसूताची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आशा सेविकेने दिली. आम्ही तात्काळ पोहोचलो. तेथे भुमका परिहारकडून उपचार सुरू होता. त्यांना आरोग्य सेवा घेण्याकरिता विनवणी केली. त्यांचा उपचार तीन तास चालला. तोपर्यंत आम्हाला थांबवून ठेवले.
- एस. डी. नांदूरकार
परिचारिका, उपकेंद्र, जुटपानी