महिलेची विष पाजून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:00 PM2018-02-17T23:00:45+5:302018-02-17T23:01:16+5:30

ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली.

Woman's poisonous killing | महिलेची विष पाजून हत्या

महिलेची विष पाजून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देसाऊर रामानारायणपूर येथील घटना : ई-क्लास जमिनीवरील पिकांचा वाद

आॅनलाईन लोकमत
अमरावती : ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली. संगीता प्रल्हाद चव्हाण (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रामेश्वर धर्माजी चव्हाण व त्याची पत्नी चंचला यांना अटक केली.
रामा साऊर येथील ई-क्लास जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पिकावरून संगीता चव्हाण व आरोपी रामेश्वर चव्हाण यांच्यात वाद होता. शनिवारी सकाळी संगीता ही तिच्या चार वर्षीय वैभवी नामक मुलीसोबत शेतात हरभरा काढण्यासाठी गेली होती. यादरम्यान तेथे रामेश्वर चव्हाण व त्याची पत्नी दाखल झाली. त्यांनी संगीताशी वाद घातला, मारहाण केली आणि जबरीने विष पाजल्याचा आरोप संगीताच्या कुटुंबीयांनी केला. हा प्रकार घडत असतानाच संगीताची सासू रेखा रामदास चव्हाण शेतापर्यंत पोहोचल्या. त्यांनी संगीताला ११.१० वाजता गंभीर अवस्थेत अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. अवघ्या १० मिनिटांत तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाइकांचा रोष उफाळून आला. तणावाची परिस्थिती पाहून वलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुरुळकर, एपीआय महेश नरवणे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले आणि नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळी संगीताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर तिचे पार्थिव नातेवाइकांनी थेट वलगाव पोलीस ठाण्यात नेण्याची भूमिका घेतली. आरोपींना अटक केल्याशिवाय शव उचलणार नसल्याचा त्यांचा पवित्रा होता. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. यानंतर संगीताची सासू रेखा चव्हाण यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी रामेश्वर चव्हाण व चंचला चव्हाण यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. दोघांनाही रात्री अटक करण्यात आली. घटनेमुळे गावात तणाव असल्याने पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.
पोलीस आयुक्तांपर्यंत गेला होता वाद
अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबीयांत ई-क्लास जमिनीच्या पिकावरून वाद सुरू आहे. मध्यंतरी हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी वलगाव ठाण्यापर्यंत पोहोचले. वाद चिघळत असल्याचे पाहून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यातील एक कुटुंब वलगाव पोलिसांविरोधात पोलीस आयुक्ताकडे गेले. मंत्रालयातील पदाधिकाºयांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. यासंबंधाने वलगाव पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना पोलीस आयुक्तांसमोर हजर केले होते.

ई-क्लास जमिनीवरील पिकांचा वाद अनेक वर्षांपासून सुरू होता. यासंदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. शनिवारी महिलेच्या मृत्यूप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- अनिल कुरुळकर, पोलीस निरीक्षक वलगाव ठाणे

Web Title: Woman's poisonous killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.